Pune Rain Ashadi Wari Alandi : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. अशात आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे : राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने मुंबई-पुण्यासह राज्यभरातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे, सततच्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पूरपरिस्थितीनंतर मंदिर प्रशासनाने आषाढी वारीसाठी ज्ञानोबा महाराजांची पालखी आळंदीमध्ये येण्याबाबत आणि वारकऱ्यांसाठी आवाहन केलं आहे.

इंद्रायणी नदीला पूर, चार पूल पाण्यात
इंद्रायणी नदीला पूर आला आहे. पुरामुळे आळंदी शहरात येणारे सर्व चार पूल नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अशा मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीत आळंदीमध्ये येणं सुरक्षित नाही. त्यामुळे पुण्यातील पूरस्थिती कमी होत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आनंदीमध्ये न येणाचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आळंदी शहरात येण्यासाठी जे वारकरी निघाले आहेत, त्यांनी आळंदीकडे न येता आता जिथे असाल तिथेच थांबण्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आळंदी शहरात अशा पूरस्थितीत येण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन सार्वजनिकरित्या वारकरी, भाविकांना करण्यात आलं आहे.
नाशिक, कोकण, मुंबई, पुण्यात मुसळधार
दरम्यान, राज्यात जवळपास सगळीकडे २२ जूनपर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र त्यानंतर आता आलेल्या पावसाची सर्वदूर जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक, विदर्भ, कोकण, घाट माथ्यावर धो-धो पाऊस पडतो आहे. उद्या ७ जुलै रोजी नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईतही मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
सततच्या पावसाने अनेक नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जोरदार पावसात सध्या कोणीही नदी, समुद्रात तसंच धबधबे अशा कोणत्याही ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

