Nashik Cloudburst News : नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंदाजानंतर शहरात शाळा-कॉलेजला सुट्टी देण्यात आली. तर सप्तश्रृंगी आणि त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
नाशिक : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात उद्या ७ जुलै रोजी ढगफुटीची शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्री आणि हवामान विभागाच्या माहितीनंतर नाशिक जिल्हा प्रशासन हायअलर्टवर आहे. आज ६ जुलै सोमवारी रात्रीपासून नाशिकमधील सप्तश्रृंगी मंदिर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे, भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर आज रात्रीपासून ८ जुलैपर्यंत दर्शनासाठी बंद असेल. गरज असल्याशिवाय बाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३०० मिमी पाऊस एकाच दिवसांत कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सप्तश्रृंगी गडावर ६५ मिमी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ तालुका, दिंडोरी या भागात ढगफुटीसारख्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या माहितीनंतर उद्या मंगळवारी, ७ जुलै रोजी नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीमधील शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
तसंच प्रशासनाने सतर्कतेचा इशारा म्हणून नागरिकांना घरीच थांबण्याचं सांगितलं आहे. शेतकऱ्यांनीही घरातच राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. शिवाय ढगफुटीच्या अंदाजानंतर आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नाशिकमधील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. सखल भाग, पूरस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणच्या नागरिकांना, तसंच पशूंचे गोठे स्थलांतरित करण्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच धबधबे, गड, किल्ल्यांवरही पर्यटकांनी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कठीण, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०८ आणि ११२ या क्रमांकावर फोन करण्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. गरोदर महिला ज्यांची प्रसूती पुढील दोन ते तीन दिवसांत होणार असेल तर त्यांनी आजच रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

