Nalasopara Lizard Found in Cake : नालासोपाऱ्यातील एका दुकानातून घेतलेल्या केकमध्ये मेलेली पाल आढळली. हा केक खाल्ल्यानंतर ७ ते ८ जणांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नालासोपारा : नालासोपारा शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकमध्ये मेलेली, मृत पाल आढळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. हा केक खाल्ल्यानंतर अचानक जवळपास ७ ते ८ जणांची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केकमध्ये पाल आढळल्याच्या या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा असून मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
नालासोपारामधील नीलकंठेश्वर येथील इमारतीत राहणाऱ्या एका मुलीचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त चामुंडा डेअरी या केक शॉपमधून केक आणण्यात आला होता. केक कापल्यानंतर उपस्थित सर्वजण तो खात होते. त्याचवेळी मध्येच केकमध्ये पाल दिसली. खात असलेल्या केकमध्ये मृत पाल पाहिल्यानंतर सर्वांनाच भीती वाटली.
७ ते ८ जणांनी हा केक खाल्ला होता. केक खाल्ल्यानंतरच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. उपस्थित असलेल्या ७ ते ८ जणांची तब्येत बिघडल्याने तात्काळ सर्वांना जवळच्या विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. केकमध्ये मृत पाल आढळली आणि तो केक खाल्ल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून तसंच चिंता निर्माण झाली आहे. आता या सर्वांची तब्येत नेमकी का बिघडली याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप वैद्यकीय अहवाल समोर आला नसल्याने तब्येत बिघडण्यामागचं अचूक निदान, कारण समोर आलेलं नाही.
रुग्णांची नावं -
सलोनी गुप्ता (वय 16),
उर्मिला वर्मा (वय 32),
सुदीक्षा शाह (वय 19),
प्राची यादव (वय 8 वर्षे)
रुद्र शाह (वय 13 वर्षे)
आफिया इद्रिस (वय 24),
प्रियांश वर्मा (वय 2 वर्षे),
शिव गुप्ता (वय 10), परी यादव (वय 7 वर्षे),
रुबी शाह (वय 40), प्रिया वर्मा (वय 8 वर्षे)

