Maharashtra Municipal Election 2026 : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरू असून मुंबईतील दादर येथील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये पहिला दुबार मतदार आढळून आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Maharashtra Municipal Election 2026 : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया (Maharashtra Municipal Election 2026) पार पडत असून सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर पहाटेपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. अशातच मुंबईतून एक महत्त्वाची आणि चर्चेची माहिती समोर आली असून, दादरमधील एका वॉर्डमध्ये पहिला दुबार मतदार आढळून आला आहे.
दुबार मतदारांवरून राजकीय वातावरण तापले
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दुबार मतदार आढळल्यास कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मुंबईतील पहिला दुबार मतदार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वॉर्ड क्रमांक 192 मध्ये नेमके काय घडले?
दादर येथील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळी मतदानाचा अधिकार बजावला. याचवेळी मतदान केंद्रावर एक महिला मतदार दुबार मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित मतदाराला तात्काळ थांबवण्यात आले. आधारकार्ड तपासल्यानंतर तिच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले असून निवडणूक नियमांनुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या चुकीचा आरोप
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी ही संपूर्ण चूक निवडणूक आयोगाची असल्याचा आरोप केला आहे. वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार प्रीती पाटणकर यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामुळे दुबार मतदाराचा मुद्दा अधिकच संवेदनशील ठरला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक :
उमेदवार आणि यंत्रणांची माहिती
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 1700 उमेदवार रिंगणात आहेत.
पुरुष उमेदवार : 822, महिला उमेदवार: 878
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 64,375 निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 4,500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. मतदान यंत्रांची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली येथील केंद्रांमध्ये करण्यात आली आहे.
ईव्हीएम यंत्रणांची साठवणूक व्यवस्था
विक्रोळी गोदामात 10,800 कंट्रोल युनिट्स आणि 13,500 बॅलेट युनिट्स ठेवण्यात आले आहेत. तर कांदिवली येथील केंद्रात 9,200 कंट्रोल युनिट्स आणि 11,500 बॅलेट युनिट्स सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. प्रशासनाकडून कडक देखरेख ठेवण्यात आली आहे.


