Sanjay Raut on Cabinet Reshuffle : शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या भेटीनंतर त्यांच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं आहे. राहुल गांधींच्या दबावामुळेच मोदी सरकारला मंत्रिमंडळात फेरबदल करावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर, शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला हवा दिली आहे. त्यांनी इंडिया आघाडीतील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली.
मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी NEET-UG परीक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर दबाव आणल्याबद्दल राहुल गांधींचं कौतुक केलं.
'राहुल गांधींच्या दबावामुळेच मंत्रिमंडळात फेरबदल' - राऊत
शिवसेना (UBT) नेते म्हणाले, "विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी सरकारवर दबाव आणला आहे आणि त्यांना चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधींमुळेच पंतप्रधान मोदींना मंत्रिमंडळाचे चेहरे बदलावे लागत आहेत. पण, जर डोकं तेच ठेवून बाकीच्या भागाची शस्त्रक्रिया केली, तर त्याला मंत्रिमंडळ फेरबदल म्हणता येणार नाही."
'पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची प्रतिमा डागाळली'
केंद्र सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिमा डागाळली आहे. भाजपमध्ये मंत्रिमंडळात प्रभावीपणे काम करू शकतील असे नेतेच नाहीत, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची प्रतिमा खराब झाली आहे. एक-दोन नेते सोडले, तर भाजपच्या मंत्रिमंडळात प्रभावी काम करणारे नेतेच नाहीत. शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी ही मोठी नावं आहेत, बाकी सगळे देवाच्या कृपेवर काम करत आहेत. याचा परिणाम देशाच्या विकासावर होत आहे. अमित शहांची प्रतिमा तर खूपच खराब झाली आहे, त्यामुळे आधी त्यांना बाजूला केलं पाहिजे."
केंद्रातील बदलांच्या चर्चेला दुजोरा देताना त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जबाबदारी स्वीकारतील या जुन्या चर्चेला पुन्हा तोंड फोडलं. ते म्हणाले, "अमित शहांना पंतप्रधान म्हणून कोणीही कधीच स्वीकारणार नाही. मोदींनंतर भाजपकडे पंतप्रधानपदासाठी दुसरा चेहराच नाही. देशाच्या नेतृत्वाबाबत आता RSS मध्ये चर्चा सुरू झाली आहे. मी वारंवार सांगितलं आहे की, देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जबाबदारी स्वीकारावी लागू शकते."
'राहुल गांधी देशाचे निर्विवाद नेते'
दिल्लीत राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीचं वर्णन करताना राऊत म्हणाले, "मी राहुल गांधींसोबत अनेक राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील मुद्द्यांवर चर्चा केली. राहुल गांधींचं नेतृत्व पंतप्रधान मोदींच्या खूप पुढे गेलं आहे. राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेते बनत आहेत आणि ते स्पष्ट दिसत आहे."
राऊत यांनी दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र आणि देशभरातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. त्यांना भेटल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते - ते मोदी, शहा आणि इतरांच्या खूप पुढे निघून गेले आहेत."

