नेपाळमधील भीषण पुरामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. मृतांचे मृतदेह भारतातील नद्यांमध्ये वाहत येत असल्याने चिंता वाढली आहे. २९० भारतीयांसह १५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढतोय. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे पुरातील मृतदेह भारतातील नद्यांमध्ये वाहत येत असल्याने चिंता आणखी वाढली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, २९० भारतीयांसह तब्बल १५०० जणांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. यामध्ये केरळमधील ३३ जणांचाही समावेश आहे. कम्युनिकेशन यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्यामुळे अनेक लोकांशी संपर्क होऊ शकलेला नाही.
नेपाळच नाही, तर चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटच्या भागातही २०० हून अधिक भारतीय अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. याच दरम्यान, चीनने नेपाळला एक नवीन इशारा दिला आहे. तिबेटमधील आणखी एक मोठं सरोवर फुटण्याची शक्यता असून, पुढील दोन दिवस सतर्क राहण्यास सांगितलं आहे.
पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळला मदत करण्यासाठी भारत पुढे सरसावला आहे. मदत सामग्री घेऊन भारतीय हवाई दलाची आणखी विमानं नेपाळमध्ये पोहोचतील. पुनर्बांधणीच्या कामातही भारत नेपाळला मदत करणार आहे. सरकारची परवानगी मिळाल्यास, लष्कराची एक विशेष टीम बचावकार्यासाठी नेपाळला रवाना होईल.

