Lalbaugcha Raja Auction: मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आणि वस्तूंचा लिलाव सुरू झाला आहे. भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या गणेशमूर्तीची विक्री ५१ हजार रुपयांना झाली आहे. 

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आणि वस्तूंचा बहुप्रतीक्षित लिलाव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लिलावाला भरघोस प्रतिसाद दिला आहे.

चांदीच्या गणपतीने झाली सुरुवात

लिलावाची सुरुवात भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या गणेशमूर्तीने झाली आहे. एका भाविकाने ही मूर्ती ५१ हजार रुपयांना विकत घेतली, आणि यानंतर लिलावाचा रंगतदार सिलसिला सुरू झाला.

लाखोंच्या वस्तू लिलावात

या लिलावात आतापर्यंत अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश झाला आहे.

मोदक पिरॅमिड – ₹३०,०००

चांदीचा मूषक – ₹३१,०००

चांदीचा कलश – ₹४२,०००

सोन्याची साखळी – ₹१,६६,०००

मोदक (स्वर्ण व रौप्य) – ₹४१,०००

या लिलावातून आतापर्यंत लाखो रुपयांची रक्कम मंडळाच्या तिजोरीत जमा झाली आहे.

लिलावात कोणकोणत्या वस्तू?

लालबागच्या राजाच्या चरणी यंदा अर्पण झालेल्या वस्तूंमध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे.

बॅट

चांदीचे व सोन्याचे मोदक

गदा

चांदीचे समई (छोट्या व मोठ्या)

चांदीचा उंदीर

रत्नजडित हार

कलश

मोदकांचे ताट

या वस्तूंचा लिलाव गुरुवारी सायंकाळी सुरू झाला असून, रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. परिसरातील नागरिक आणि भाविक लिलाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमले आहेत.

गेल्या वर्षी ७० लाखांचा लिलाव!

मागील वर्षी गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या लिलावातून मंडळाला ७० लाख रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त झाली होती. यंदा देखील लिलावातून मोठी रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.