KDMC Shivsena MNS Alliance : कल्याण-डोंबिवली महापालिकेत स्पष्ट बहुमत नसल्यामुळे राजकारण तापले आहे. शिंदे सेना आणि मनसे यांच्यातील युतीमुळे महापौरपदासाठी नवे सत्तासमीकरण तयार होत असून, भाजप आणि ठाकरे गट बाजूला
KDMC Shivsena MNS Alliance : कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. महापौरपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीतून नवी सत्तासमीकरणे आकार घेत असल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची हालचाल वेगाने सुरू केली आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गट बाजूला पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे सेना–मनसे युतीवर शिक्कामोर्तब?
गेल्या दोन दिवसांपासून मनसे आणि शिंदे सेनेत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू होत्या. जरी याबाबत कोणत्याही पक्षाने अधिकृत घोषणा केली नव्हती, तरी बुधवारी मनसे आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी एकत्र गट नोंदणी केल्याने युती जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. या युतीमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि ठाकरे गटाला बाजूला ठेवून नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
गट नोंदणीने वाढवली सत्तास्थापनेची चर्चा
बुधवारी मनसेचे 5 आणि शिंदे सेनेचे 53 नगरसेवक एकाच वेळी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात गट नोंदणीसाठी पोहोचले. दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्र येणे हा योगायोग की ठरवून केलेले राजकीय टायमिंग, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या घटनेनंतर शिंदे सेना–मनसे युतीच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
बहुमताचे गणित आणि फोडाफोडीची चर्चा
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 62 नगरसेवकांची गरज आहे. सध्या शिंदे गटाकडे 53 नगरसेवक असून, मनसेकडे 7 नगरसेवक असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटातून फोडलेल्या दोन नगरसेवकांसह मनसेमध्ये पुन्हा दाखल झालेले नगरसेवक सत्तास्थापनेवेळी मनसेसोबत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सेना–मनसे युती बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचल्याचे चित्र आहे.
श्रीकांत शिंदे–राजू पाटील भेटीचा फोटो व्हायरल
शिंदे सेना आणि मनसेचे नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले असताना खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मनसेचे नेते राजू पाटील यांची भेट झाली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट संकेत दिले. “विकासासाठी जो आमच्यासोबत येईल, त्याला आम्ही सोबत घेऊ,” असे त्यांनी म्हटले आहे.


