Kalyan Dombivli Election 2026 : महापौरपदासाठी सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे कल्याण-डोंबिवलीत अभूतपूर्व राजकीय नाट्य रंगले आहे. नगरसेवकांच्या फोडाफोडीमुळे सर्वच पक्ष सावध झालेत.
Kalyan Dombivli Election 2026 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापौरपदावर आपला उमेदवार बसवण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तीव्र रस्सीखेच सुरू आहे. या सत्तासंघर्षातूनच ठाकरे गट आणि मनसेच्या नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असून, शहरात नाट्यमय आणि चक्रावून टाकणाऱ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.
फोडाफोडीच्या राजकारणाने कल्याण-डोंबिवलीत खळबळ
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गट व मनसेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले असले तरी मंगळवारी कोकण भवनात गट नोंदणीवेळी फक्त 7 नगरसेवक उपस्थित राहिले. उर्वरित चारपैकी दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, तर दोन नगरसेवक मनसेच्या गोटात दाखल झाले आहेत.
ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार, अपात्रतेची मागणी
ठाकरे गटाने मंगळवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची अधिकृत नोंदणी केली. यावेळी शिंदे गटाच्या संपर्कात असलेल्या दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र सादर करण्यात आले. हे दोन्ही नगरसेवक गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल असून, गटनेता निवडीच्या बैठकीलाही गैरहजर होते. या घटनेनंतर ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
मनसेची ताकद वाढली, नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना
स्वप्नील केणे आणि राहुल कोट हे दोन नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याने मनसेची संख्या 5 वरून 7 झाली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी ठाकरे गटाचे 7 आणि मनसेचे 2 असे एकूण 9 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
बहुमताचा आकडा आणि सत्तेची गणिते
कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी 62 नगरसेवकांचा बहुमताचा आकडा महत्त्वाचा आहे. सध्या शिंदे गटाकडे 53, भाजपाकडे 50, ठाकरे गटाकडे 7 आणि मनसेकडे 7 नगरसेवक आहेत. त्यामुळे पुढील काही तासांत किंवा दिवसांत मोठे राजकीय उलटसुलट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटातून कोण फुटले?
ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक फुटल्याची माहिती आहे. या दोघांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दोघेही सध्या गायब असून, त्यांच्या घराबाहेर पक्षाच्या बैठकीची नोटीस लावण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्यातील भेटीमुळेही राजकीय चर्चांना वेग आला आहे.


