Devendra Fadnavis CJP Protest Delhi Lathi Charge : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर प्रतिक्रिया देत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे गरजेचं होतं असं म्हटलं आहे.

मुंबई : दिल्लीत २० जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. देशभरात या आंदोलनाची मोठी चर्चा आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यात अनेकांची डोकी फुटली असून मोठ्या संख्येने आंदोलक जखमी झाले आहेत. यानंतर देशभरातून आंदोलनकांना अशाप्रकारे आक्रमकपणे मारल्याने संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले फडणवीस?

'दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरजेचा होता. पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता, तर अनावश्यक गोष्ट घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम दाखवला. जेवढी कारवाई करणं गरजेचं असतं, ती कारवाई पोलिसांनी केली आहे.'

'आंदोलन चेहराहीन, पोलिसांनी कंट्रोल केला नसता तर अनर्थ…'

'लोकशाहीमध्ये आंदोलनाचा प्रत्येकाला हक्क आहे. पण अशावेळी संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत. शांततापूर्ण कोणी परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, तर त्या आंदोलनाला अधिकार आहे. मात्र राजकीय अशांतता तयार करुन विनापरवानगी आंदोलन, हिंसा करणं योग्य नाही. अनेक राजकीय पक्ष आणि संघटना आपला हेतू साध्य करण्यासाठी अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आंदोलन चेहराहीन आहे. त्यामुळे ते भरकटलेलं आहे. अनेक आंदोलकांनी मोठं नुकसान केलं आहे, गाड्या फोडल्या आहेत, पोलिसांवर दगडफेक केली आहे. कोणत्याही सरकारला लाठीचार्ज करणं आवडत नाही, मात्र कालची परिस्थिती पाहता अशावेळी पोलिसांनी वेळीच कंट्रोल केला नसता तर अनर्थ घडला असता.'

'वेगळ्या प्रवृत्ती आंदोलनात घुसतात…'

'मी सगळ्या आंदोलकांवर आरोप करत नाही. काही चांगल्या भावनेने आंदोलनात आलेले असतात. पण काही वेगळ्या प्रवृत्ती आंदोलनात घुसतात आणि आंदोलकांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन आपला स्वार्थ कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न करतात. सगळे एकाच विचाराने तिथे आलेले नाहीत', असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.