BMC Election 2026 : महापालिका निवडणुकांतील मतदानाच्या शाईबाबत पसरलेल्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शाई पुसली जात नसून, 2011 पासून वापरात असलेलेच मार्कर पेन वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
BMC Election 2026 : महापालिका निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईबाबत (Voting Ink) तक्रारी आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने या आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. मतदानानंतर काही वेळात शाई पुसली जाते, असा दावा चुकीचा असून, याबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
शाई पुसली जात असल्याचा दावा फेटाळला
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, मतदानासाठी जी शाई वापरली जात आहे तीच शाई केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत वापरतो. “ही शाई काढता येत नाही. शाई ड्राय झाल्यानंतर ती पुसली जात नाही. 2011 पासून आम्ही याच कंपनीचे मार्कर पेन वापरत आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मार्कर पेनबाबत पसरवला जातोय संभ्रम
“बोटावरची मतदानाची शाई पुसली जातेय, असा संभ्रम जाणीवपूर्वक पसरवला जात आहे,” असे म्हणत वाघमारे यांनी सांगितले की, याआधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही अशाच तक्रारी आल्या होत्या. मात्र, तपासणीत त्या निराधार ठरल्या. “आम्ही कोरस कंपनीचे मार्कर पेन वापरत नाही. एकाच कंपनीचे मान्यताप्राप्त मार्कर पेन सातत्याने वापरले जात आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुबार मतदारांवर कडक तपासणी
दुबार मतदानाच्या मुद्द्यावर भाष्य करताना आयुक्तांनी सांगितले की, ओळख पटवल्याशिवाय कोणालाही मतदान करण्याची परवानगी दिली जात नाही. “मुंबईत तर काही ठिकाणी मतदारांकडून दोन ओळखपत्रे मागितली जात आहेत. शिवाय, प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, जे स्थानिक मतदारसंघातीलच असतात,” असे त्यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांच्या शाईचे उदाहरण
“माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे आणि त्यांच्या बोटावरील शाई अजूनही तशीच आहे. ती पुसली गेलेली नाही,” असे उदाहरण देत वाघमारे यांनी शाईबाबतचे आरोप फेटाळले. मुंबईतील काही ठिकाणी शाई पुसल्याच्या घटना समोर आल्याच्या दाव्यांवरही आयोगाने यापूर्वीच आवश्यक तपास केल्याचे त्यांनी सांगितले.
फेक नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप
राज्य निवडणूक आयुक्तांनी शेवटी स्पष्ट केले की, “2011 पासून आम्ही जी शाई वापरत आहोत, तीच सध्या वापरली जात आहे. या मुद्द्यावर फेक नरेटिव्ह पसरवले जात असून, त्याला नागरिकांनी बळी पडू नये.”


