BMC Election 2026 : बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर मनसेचे नेते संतोष धुरी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट व उमेदवारी न मिळाल्यामुळे निर्माण झालेली नाराजी या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. धुरी यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, चर्चांना उधाण

संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज मंगळवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत धुरी यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. या भेटीवेळी भाजप नेते व मंत्री नितेश राणे तसेच किरण शेलार उपस्थित होते.

ठाकरे बंधूंची युती आणि मनसेतील नाराजी

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी काही नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. युतीनंतर अपेक्षित उमेदवारी न मिळाल्याने संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा होती.

उमेदवारीवरून वाद, भाजप प्रवेशाची शक्यता

संतोष धुरी यांना अपेक्षित असलेला वॉर्ड क्रमांक 194 ठाकरे गटाला मिळाल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट आणि भाजप नेत्यांशी वाढलेला संपर्क पाहता धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता बळावली आहे.

“नाराज नाही, पुढील दिशा लवकरच सांगणार” – संतोष धुरी

दरम्यान, माध्यमांशी बोलताना संतोष धुरी यांनी नाराजीच्या चर्चांना फेटाळून लावले. “मी नाराज नाही. माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. मित्र म्हणून मी नितेश राणे यांची भेट घेतली. अटीशर्तींवर कुठल्याही पक्षात जाणं मला मान्य नाही. राज साहेबांसोबत जातानाही मी कोणत्याही अटी घातल्या नव्हत्या. मात्र, माझी पुढील राजकीय दिशा मी दुपारी स्पष्ट करणार आहे,” असे धुरी यांनी सांगितले.