कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानाआधीच भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा राजन चौधरी आणि 26 क मधून आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, ज्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
Kalyan Dombivli Mahapalika Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या (Kalyan Dombivli Mahapalika Election) मतदानाआधीच भाजपसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 18 अ आणि 26 क मधून भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विरोधी उमेदवारांकडून कोणताही अर्ज न आल्याने भाजपने निकालाआधीच विजयाचे खाते उघडले आहे
प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी बिनविरोध विजयी
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 अ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या राखीव जागेसाठी भाजपच्या रेखा राजन चौधरी यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र या जागेसाठी दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्याने रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
-प्रभाग क्रमांक 26 क मधूनही भाजपचा बिनविरोध विजय
भाजपसाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपच्या उमेदवार आसावरी केदार नवरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या दोन जागांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपने निवडणुकीपूर्वीच विजयाचे खाते उघडले असून पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.
रेखा चौधरी यांची पार्श्वभूमी आणि भाजपची प्रतिक्रिया
रेखा राजन चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या असून त्या भाजप महिला मोर्चाच्या कल्याण विभागाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या बिनविरोध विजयाला भाजपकडून ‘हिंदुत्वाचा पहिला विजय’ अशी अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश आल्याचेही पक्षाकडून सांगण्यात आले.
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर यांसारख्या शहरांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय गडबड पाहायला मिळाली. उमेदवारांना 2 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.


