BJP MIM Alliance : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमने अनपेक्षित युती करत सत्ता स्थापन केली आहे. कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

BJP MIM Alliance : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. निवडणुकीदरम्यान एकमेकांवर जोरदार टीका करणारे भाजप आणि एमआयएम (MIM) आता सत्तेसाठी एकत्र आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत या दोन कट्टर विरोधी पक्षांनी अनपेक्षित युती करत सत्ता समीकरण बदलून टाकले आहे. या घडामोडीमुळे राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

विरोधकांपासून सत्तासोबतीपर्यंतचा प्रवास

निवडणुकीच्या काळात “भाजपसोबत कधीच जाणार नाही” अशी भूमिका एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी घेतली होती. मात्र अचलपूरमध्ये राजकारणाने वेगळेच वळण घेतले असून, सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि एमआयएम एकाच मंचावर आले आहेत. यामुळे “राजकारणात कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो” हे वाक्य पुन्हा एकदा खरे ठरले आहे.

अचलपूरचे ‘विचित्र’ पण निर्णायक समीकरण

अचलपूर नगरपरिषदेच्या समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने एमआयएमचा पाठिंबा घेत आपली सत्ता मजबूत केली आहे. विशेष म्हणजे, या युतीमुळे एमआयएमलाही सत्तेतील महत्त्वाचे पद मिळाले आहे. एमआयएमच्या एका नगरसेविकेची शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती पदी निवड करण्यात आली आहे.

स्थानिक राजकारणात उलथापालथ

मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर नगरपरिषदेत एमआयएमचे तीन नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दोन आणि अपक्ष तीन नगरसेवक निवडून आले होते. या सर्वांनी एकत्रित गट तयार करत भाजपला पाठिंबा दिला आहे. या स्थानिक राजकीय समीकरणामुळे सत्तास्थापन शक्य झाली असून, याचे पडसाद आता राज्यपातळीवर उमटण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय असणार?

ही युती स्थानिक नेत्यांच्या पातळीवर झाली की वरिष्ठ नेतृत्वाच्या संमतीने, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला असेल, तर पक्षांकडून काही कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.