मुंबईत राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात बेकायदेशीररित्या सुरू असणारी बाईक टॅक्सीची सुविधा आता बंद करण्यात आली आहे. ओला, उबर या कंपन्यांनी देखील त्यांची बाईक टॅक्सीची सुविधा बंद केली आहे.
मुंबई : सध्या एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांशजण सार्वजनिक वाहतूकीएवजी ओला, उबरच्या माध्यमातून प्रवास करणे पसंत करतात. अशातच याच कंपन्यांनी बाईक टॅक्सीची देखील सुविधा नागरिकांसाठी सुरू केली होती. पण याच सुविधेवर आता गदा आली आहे. खरंतर, राज्य सरकारच्या धोरणाविरोधात बेकायदेशीरपणे शहर आणि उपनगरांमध्ये धावणारी बाइक टॅक्सी सेवा अखेर बंद करण्यात आली आहे. ओला, उबर यांसारख्या ॲप आधारित कंपन्यांनी आपल्या मोबाईल ॲपमधून बाइक टॅक्सीचे बुकिंग बंद केले आहे. मात्र, सरकारमान्य ई-बाईक टॅक्सी सेवा कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी रात्री स्वतः बाइक टॅक्सी सेवा वापरून पाहण्याचा प्रयत्न केला. आरक्षण करताना त्यांनी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली असता, शहरात सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
ओला आणि उबर या प्रमुख ॲप आधारित सेवा कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून दुचाकी बुकिंग सुविधा थांबवली आहे. ओला ॲपवर बाइक टॅक्सी पर्याय दिसत असला तरी बुकिंग पूर्ण होत नाही, तर उबर ॲपमध्ये हा पर्यायच दिसत नाही, अशी माहिती प्रवासी दिनेश महाडिक यांनी दिली.
या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात परिवहन विभागाने तक्रारी नोंदवल्यानंतर आझाद मैदान पोलिस ठाण्यात उबर आणि रॅपिडो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओला विरोधातही पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे गंभीर प्रकरण मानत, मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाईचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.