BEST Bus Route Change: मुंबईतील प्रवाशांसाठी, बेस्ट उपक्रमाने 1 नोव्हेंबरपासून 23 बस मार्गांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांमध्ये 8 प्रमुख मार्गांवर वातानुकूलित (एसी) बससेवा आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीएसएमटी दरम्यान नवीन ए-207 मार्ग सुरू केली. 

मुंबई: मुंबईतील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बेस्ट उपक्रमाने शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुटसुटीत करण्यासाठी तब्बल 23 बस मार्गांमध्ये मोठे बदल केले आहेत. हे बदल 1 नोव्हेंबरपासून लागू झाले असून, नव्या वेळापत्रकासह प्रवाशांना अधिक वेगवान, आरामदायक आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

नव्या नियोजनाचे वैशिष्ट्य

बेस्ट प्रशासनाने या नव्या नियोजनात 8 प्रमुख मार्गांवर वातानुकूलित (एसी) बससेवा सुरू केली आहे. यामुळे गर्दीच्या वेळीही प्रवास आरामदायक होणार आहे. तसेच, वर्ल्ड ट्रेड सेंटर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यानचा नवा ए-207 मार्ग सुरू करण्यात आला आहे. हा मार्ग मेट्रो, रेल्वे आणि व्यावसायिक केंद्रांना जोडणारा असल्याने प्रवाशांसाठी अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.

नवीन ए-207 मार्गाचे तपशील

हा नवा ए-207 मार्ग पुढील प्रमुख ठिकाणांमधून धावणार आहे. जी. डी. सोमानी मार्ग, कुलाबा मार्केट, बेरेक नं. 1, नवी नगर, सह्याद्री नगर, एल्फिन्स्टन ब्रीज, दादर, प्रभादेवी, महालक्ष्मी, हाजी अली, पेडर रोड, गिरगाव चौपाटीमार्गे सीएसएमटी. हा मार्ग विशेषतः शासकीय, खासगी कार्यालये आणि व्यावसायिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

एसी बसमध्ये रूपांतरित झालेले महत्त्वाचे मार्ग

ए-207 : मालवणी आगार - दहिसर बसस्थानक

ए-211 : वांद्रे बसस्थानक - फादर अँग्नेल आश्रम

ए-215 : वांद्रे रेक्लेमेशन - टाटा वसाहत

ए-399 : ट्रॉम्बे - महाराणा प्रताप चौक (मुलुंड)

ए-410 : विक्रोळी आगार - महाकाली गुंफा

ए-604 : नागपाडा स्थानक - महाकाली मुहा

ए-605 : भांडुप स्टेशन - टेम्भीपाडा

ए-606 : भांडुप स्टेशन - अशोक केदारे चौक

पूर्व उपनगरातील प्रवाशांसाठी मोठी सोय

या बदलांचा गोरेगाव, दिंडोशी, ठाणे लिंक रोड, विक्रोळी, घाटकोपर-अंधेरी, भांडुप आणि मुलुंड परिसरातील प्रवाशांना विशेषतः मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी, महिला, कार्यालयीन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अधिक सुलभ आणि वेगवान ठरणार आहे.

बेस्ट प्रशासनाचा विश्वास

बेस्टच्या अधिकाऱ्यांच्या मते, या सुधारित मार्गांमुळे प्रवाशांची संख्या वाढेल, प्रवास अधिक आरामदायक आणि वेळेत पूर्ण होईल, तसेच वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. ही नवी बससेवा मेट्रो आणि रेल्वे प्रवासाला जोडणारी साखळी म्हणून काम करणार आहे.