Best Bus : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेता, बेस्ट उपक्रमाने 31 डिसेंबरच्या रात्री अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवेअंतर्गत 25 जादा बसेस विविध पर्यटन स्थळांवरून धावणार आहे.
मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सजली असताना, नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सर्वच सार्वजनिक वाहतूक यंत्रणा विशेष नियोजन करत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेनंतर आता बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमानेही थर्टीफर्स्टच्या रात्री मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बांद्रा बँडस्टँड यांसह शहर व उपनगरातील विविध ठिकाणी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक बाहेर पडतात. हीच गर्दी लक्षात घेता, बेस्टकडून 31 डिसेंबरच्या रात्री अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे थर्टीफर्स्टला रात्री उशिरापर्यंत मुंबई फिरण्याचा तुमचा प्लॅन असेल, तर ही माहिती नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
31 डिसेंबरच्या रात्री 25 जादा बस
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचं चित्र दरवर्षी पाहायला मिळतं. ही बाब लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाने 31 डिसेंबरच्या रात्री 25 अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष बससेवा 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून सुरू होऊन 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत उपलब्ध असणार आहे. यामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
हेरिटेज टूरचाही अनुभव
या विशेष उपक्रमाअंतर्गत बेस्टची हेरिटेज टूर बस देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. या बसद्वारे पर्यटकांना मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध स्थळांचं दर्शन घेता येणार आहे. विविध मार्गांवर मिळून एकूण 25 बसेस धावणार असून, आवश्यकतेनुसार आणखी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
प्रवाशांसाठी मदत केंद्र आणि अधिकारी तैनात
प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टतर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू, गोराई समुद्रकिनारा, चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि बस निरीक्षकांची विशेष नेमणूक करण्यात येणार आहे.
कोणकोणत्या मार्गांवर मिळणार बससेवा?
ए 21 – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते देवनार आगार
बससंख्या: 3
सी 86 – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते वांद्रे बसस्थानक (प.)
बससंख्या: 3
ए 112 – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट)
बससंख्या: 4
ए 116 – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते सीएसएमटी
बससंख्या: 5
203 – अंधेरी स्थानक (प.) ते जुहू बीच
बससंख्या: 2
231 – सांताक्रुझ (प.) ते जुहू बस स्थानक
बससंख्या: 4
ए 247 / ए 294 – बोरिवली स्टेशन ते गोराई बीच आणि गोराई बीच ते बोरिवली स्टेशन
बससंख्या: 2
272 – मालाड स्टेशन ते मार्वे बीच
बससंख्या: 2
नववर्षाच्या जल्लोषात सहभागी होताना प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी व्हावा, यासाठी बेस्टचा हा उपक्रम मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. थर्टीफर्स्टच्या रात्री फिरण्याचा प्लॅन असेल, तर या विशेष बससेवेचा नक्की लाभ घ्या.


