Indias First Musical Road: मुंबई कोस्टल रोडवर देशातील पहिला 'म्युझिकल रोड' तयार करण्यात आला. वरळी येथील बोगद्यानंतरच्या ५०० मीटरच्या पट्ट्यावर ७०-८० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवल्यास रस्त्यावरील विशेष ग्रूव्ह्समुळे 'जय हो' ही प्रसिद्ध धून ऐकू येते.
मुंबई : मुंबईकरांसाठी एक अनोखी आणि रोमांचक बातमी! मुंबई कोस्टल रोडवरील एका मार्गिकेवर वाहन चालवताच आता संगीत ऐकू येणार आहे. देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’ मुंबईत साकारण्यात आला असून, ठराविक वेगाने वाहन चालवले तर गाडीत बसूनच ‘जय हो’ ही गाजलेली धून ऐकता येणार आहे.
कुठे आहे हा म्युझिकल रोड?
हा विशेष रस्ता नरिमन पॉइंट ते वरळी या उत्तरवाहिनी मार्गिकेवर तयार करण्यात आला आहे. वरळी येथील भूमिगत बोगद्यातून बाहेर पडताच, डिव्हायडरलगतच्या पहिल्या लेनमध्ये सुमारे ५०० मीटरचा विशेष पट्टा तयार करण्यात आला आहे. या पट्ट्यावर विशिष्ट अंतरावर आणि मोजमापानुसार विशेष ग्रूव्ह्स (रंबल स्ट्रिप्स) बसवण्यात आले आहेत.
70-80 किमी वेगातच ऐकू येईल संगीत
वाहन जर ७० ते ८० किमी प्रतितास या वेगाने चालवले, तर टायर आणि रस्त्याच्या पृष्ठभागातील घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींमुळे ‘जय हो’ ही धून स्पष्ट ऐकू येते. म्हणजेच, योग्य वेग राखल्यास प्रवासाचा अनुभव अधिक खास होणार आहे.
वाहनचालकांसाठी सूचना
वाहनचालकांना पूर्वसूचना मिळावी म्हणून बोगद्यात ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर अंतरावर सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चालकांना योग्य वेग राखून हा अनोखा अनुभव घेता येईल.
कल्पना कुणाची?
या संकल्पनेची मांडणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. मुंबई महापालिकेने (BMC) ती प्रत्यक्षात उतरवत शहरात एक वेगळा आकर्षणबिंदू निर्माण केला आहे. मुंबई कोस्टल रोडवरील हा ‘म्युझिकल रोड’ केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेची अनोखी सांगड आहे. आता मुंबईत ड्राइव्ह करताना प्रवासासोबत संगीताचीही साथ मिळणार आहे!


