- Home
- Mumbai
- Mumbai Local : नववर्षाच्या रात्री मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय, मध्यरात्रीनंतर धावणार विशेष लोकल; शेवटची लोकल कधी?
Mumbai Local : नववर्षाच्या रात्री मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय, मध्यरात्रीनंतर धावणार विशेष लोकल; शेवटची लोकल कधी?
Mumbai Local : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य, पश्चिम रेल्वेने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर 12 विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थानकांवर, लोकलमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात केली.

नववर्षाच्या रात्री मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय
मुंबई : 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईतील समुद्रकिनारे, चौपाट्या आणि सार्वजनिक ठिकाणी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांसाठी विशेष नियोजन केलं आहे. मध्यरात्रीनंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेकडून एकूण 12 विशेष लोकल फेऱ्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष लोकल सेवेमुळे नववर्ष साजरं करून घरी परतणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.
सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त
नववर्षाच्या रात्री कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक सुरक्षाव्यवस्था उभारली आहे. रेल्वे सुरक्षा दल (RPF), लोहमार्ग पोलीस (GRP), महाराष्ट्र सुरक्षा दल आणि होमगार्ड्सचे अतिरिक्त जवान स्थानकांवर तसेच लोकल गाड्यांमध्ये तैनात असणार आहेत. विशेषतः सीएसएमटी, दादर, चर्चगेट, मरीन लाईन्स, गिरगाव या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने येथे विशेष लक्ष दिलं जाणार आहे.
मध्य रेल्वेवरील विशेष लोकल फेऱ्या
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – कल्याण
कल्याण – CSMT
या मार्गांवर प्रत्येकी एक अशा दोन विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत.
या लोकल गाड्या मध्यरात्री 1.30 वाजता आपल्या मार्गावर रवाना होतील.
हार्बर मार्गावरील सेवा
हार्बर मार्गावर
CSMT – पनवेल
पनवेल – CSMT
या मार्गांवरही दोन विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असून, या दोन्ही लोकल गाड्यांची वेळ देखील रात्री 1.30 वाजता निश्चित करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचा नववर्षासाठी खास प्लॅन
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट – विरार मार्गावर एकूण चार विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत.
या लोकल गाड्या अनुक्रमे
रात्री 1.15, 2.00, 2.30 आणि 3.25 वाजता चर्चगेटहून सुटतील.
त्याचप्रमाणे विरार – चर्चगेट मार्गावरही चार विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार असून त्या
रात्री 12.15, 12.45, 1.40 आणि 3.05 वाजता रवाना होतील.
प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचे आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रकाची खात्री करून घेण्याचे, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नववर्षाच्या जल्लोषात सहभागी होताना सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी या विशेष लोकल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

