दरवर्षी सप्टेंबर महिन्यात माउंट मेरी फेअर म्हणजेच बांद्राची जत्रा भरते. यादरम्यान, मदर मेरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. अशातच मुंबई पोलिसांकडून या जत्रेदरम्यान वाहतूक मार्गांत बदल करण्यात आल्याची सूचना प्रवाशांना दिली आहे. 

मुंबई : मुंबई शहर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. या परंपरांमध्ये माऊंट मेरी फेअर म्हणजेच बांद्राची जत्रा विशेष मानली जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ही जत्रा भरते आणि मुंबईकरांसह देशभरातील भक्त येथे मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. ख्रिश्चन समाजासाठी हा महत्त्वाचा सोहळा असला तरी सर्व धर्मीय लोक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. अशातच मुंबई वाहतूक पोलिसांकडून येत्या 14 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. 

माऊंट मेरी चर्च

माऊंट मेरी चर्च मुंबईतील बांद्रा परिसरात समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेले आहे. हे चर्च सुमारे १०० वर्षांपेक्षा जुने असून, ‘आवर लेडी ऑफ द माऊंट’ या नावाने प्रसिद्ध आहे. येथे मदर मेरीची मूर्ती प्रतिष्ठित करण्यात आली आहे. भक्तांच्या मते येथे प्रार्थना केल्यास इच्छापूर्ती होते.

जत्रेचा इतिहास

माऊंट मेरी फेअरचा इतिहास सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा मानला जातो. सप्टेंबर महिन्यात मदर मेरीचा जन्मोत्सव (Nativity of Blessed Virgin Mary) साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सात दिवसांची जत्रा भरते. जत्रेच्या काळात चर्चमध्ये विशेष प्रार्थना, मिस्सा आणि धार्मिक कार्यक्रम होतात.

जत्रेतील आकर्षण

माऊंट मेरी फेअर म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सांस्कृतिक रंगतही आहे. जत्रेमध्ये असंख्य स्टॉल्स उभे केले जातात. यामध्ये खेळणी, रंगीबेरंगी मेणबत्त्या, शोभेच्या वस्तू, खाऊपदार्थ, मिठाई, चॉकलेट्स आणि हस्तकला वस्तूंची खरेदी-विक्री होते. विशेष म्हणजे, मेणाच्या बाहुल्या व वस्तू खरेदी करून लोक आपापल्या इच्छेनुसार चर्चमध्ये अर्पण करतात. उदाहरणार्थ, घर हवे असल्यास मेणाचं घर, अपत्यप्राप्तीसाठी मेणाचं बाळ अशा प्रतीकात्मक वस्तू अर्पण केल्या जातात.

सामाजिक आणि धार्मिक महत्त्व

माऊंट मेरी फेअर ही जत्रा विविध धर्मीय लोकांना एकत्र आणते. येथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी अशा सर्व समाजातील लोक सहभागी होतात. त्यामुळे ही जत्रा सामुदायिक सौहार्दाचे प्रतीक मानली जाते. तसेच मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून या जत्रेकडे पाहिले जाते.

पार्किंग निर्बंध

खालील रस्त्यांवर सर्व वाहनांसाठी तात्पुरती पार्किंग आणि थांबा बंदी (तात्काळ प्रवासी सोडणे/पिकअप वगळता) १४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर पर्यंत सकाळी ६:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत लागू केली जाईल:

माउंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोड (सेंट पॉल रोड आणि मेहबूब स्टुडिओ जंक्शन दरम्यान), माउंट कार्मेल रोड, चॅपल रोड, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, रेबेलो रोड, डॉ. पीटर डायस रोड आणि सेंट पॉल रोड.

रस्ते बंद आणि एकेरी वाहतूक

  • माउंट मेरी रोड : विशेष पास असलेले स्थानिक रहिवासी आणि आपत्कालीन वाहने वगळता सर्व वाहनांसाठी बंद.
  • केन रोड : माउंट मेरी रोड ते बीजे रोड पर्यंत एकेरी; स्थानिक पासधारकांशिवाय बीजे रोडवरून प्रवेश नाही.
  • परेरा रोड : पूर्वेकडून पश्चिमेकडे एकेरी मार्ग; बीजे रोडवरून प्रवेश नाही.
  • सेंट जॉन बॅप्टिस्टा रोड : स्थानिक पासधारकांव्यतिरिक्त सर्व वाहनांसाठी बंद.
  • चॅपल रोड ते वेरोनिका रोड : कार्मेल चर्च येथे उजवे वळण सर्व वाहनांसाठी बंद.