केरळमध्ये मान्सूनचे आगमन लांबले असून, तो पुढील चार दिवसांत दाखल होण्याचा नवा अंदाज आहे. महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी अनुभव येत असून, विदर्भात उष्णतेची लाट तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यासह देशभरातील नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा लागलेली असतानाच हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अंदमान-निकोबार भागात दाखल झालेला मान्सून सध्या मंदावला असून केरळमध्ये त्याच्या आगमनाला काही दिवसांचा विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पाऊस कधी होणार 

यापूर्वी २६ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र वातावरणातील बदल, कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती आणि वाऱ्यांच्या हालचालींमुळे मान्सूनची प्रगती थांबल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. आता पुढील चार दिवसांत मान्सून केरळात दाखल होऊ शकतो, असा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी परिणाम पाहायला मिळत आहे. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मान्सून उशिराने येत असला तरी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तो महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जूनच्या सुरुवातीपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते, असा अंदाज काही हवामान अहवालांमध्ये नमूद करण्यात आला आहे.

प्रचंड उकाडा वाढला 

सध्या राज्यातील अनेक भागांत प्रचंड उकाडा जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. नौतपा काळ सुरू असल्याने उत्तर आणि मध्य भारतासह काही भागांत तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे मान्सूनकडून मिळणाऱ्या दिलाशाची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. हवामान विभागाने नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील काही दिवसांत बदलत्या हवामानामुळे काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.