पुणे जिल्ह्यातील आणि शेतकरी कुटुंबातील उमेश म्हेत्रे यांनाही उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यात ते जिंकतील, त्यांचे नामांकन स्विकारले जाईल, हे समजेल.
पुणे - माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने हे पद सध्या रिक्त आहे. या पदासाठी उद्या मंगळवारी निवडणूक होणार आहे. भाजपा नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना आपला उमेदवार घोषित केले आहे. तर INDIA आघाडीने माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार केले आहे.
या सगळ्यात पुण्यातील एका व्यक्तीनेही आपले नामनिर्देशन दाखल केल्याचा दावा केला आहे. 9 सप्टेंबरला निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
उमेश म्हेत्रे यांचा दावा
ही व्यक्ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचे उमेश म्हेत्रे. ते एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत.
माध्यमांशी बोलताना म्हेत्रे म्हणाले, “मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. काल मी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. मी गरीब आणि गरजू लोकांची मदत करतो, त्यांच्या वैद्यकीय आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मुंबई- दिल्लीला जातो. लोकांच्या पोलिस प्रकरणांमध्ये मदत करतो. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदवतो. मी खासदारांना माझ्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करतो.”
उपराष्ट्रपती निवडणुकीचे नियम
- उमेदवाराने निवडणूक लढवण्यासाठी ₹15,000 इतकी ठेव (डिपॉझिट) करावी लागते.
- उमेदवाराच्या अर्जाला किमान 20 खासदार प्रस्तावक आणि 20 खासदार अनुमोदक असणे आवश्यक आहे.
- उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहातील (लोकसभा व राज्यसभा) खासदारांपासून बनलेल्या निवडणूक मंडळातून केली जाते.
- उपराष्ट्रपती संसद सदस्य किंवा कोणत्याही राज्याच्या विधानसभेचा सदस्य राहू शकत नाही. जर निवडून आला तर पदभार स्वीकारताना त्या सभागृहातील जागा रिकामी झालेली मानली जाते.
- उपराष्ट्रपती होण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असावा, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असावे आणि राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी पात्र असणे आवश्यक आहे.


