वसईमध्ये जुन्या खाडी पुलाखाली असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील एका गोणीमध्ये नवजात बाळ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

वसई : वसईतील कळंब परिसरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या खाडी पुलाखाली कचऱ्याच्या ढिगार्‍यात प्लास्टिकच्या गोणीत एक नवजात बाळ आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुमारे एक महिन्याच्या बालिकेला गोणीत ठेवून फेकण्यात आले होते.

रडण्याचा आवाज आणि धक्कादायक दृश्य

गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास, एक व्यक्ती लघुशंकेसाठी पुलाखाली गेला होता. यावेळी त्याला चिमुकल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाज कुठून येतोय, हे शोधताना त्याला कचऱ्याच्या ढिगार्‍यात प्लास्टिकची गोणी दिसली. त्याने गोणी उघडून पाहिलं असता त्या गोणीत एक बाळ दिसून आलं. त्याने तात्काळ बाळाला बाहेर काढले.

पोलिसांची तत्काळ कारवाई

सदर व्यक्तीने तत्काळ अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन वसई-विरार महानगरपालिकेच्या बोळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बाळाची प्रकृती स्थिर, पालकांचा शोध सुरू

रुग्णालयात दाखल करण्यात आलेली ही बालिका सुमारे एक ते दीड महिन्याची असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे** सांगितले आहे. दरम्यान, कोणत्या निर्दयी व्यक्तीने बाळाला फेकून दिलं, त्याचे पालक कोण आहेत, याचा शोध अर्नाळा पोलीस घेत आहेत.

समाजाला हादरवणारी घटना

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांत संतापाची भावना आहे. एक निष्पाप जीव असं कचऱ्यात टाकल्याची घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. प्रशासन आणि पोलिसांकडून बालिकेच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असून तपास सुरू आहे.

वयोवृद्ध आजीला फेकले कचऱ्यात 

गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका ६० वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध महिलेला तिच्या नातवानेच कचराकुंडीत फेकून दिल्याची घटना समोर आली होती. आजी मुंबईतील आरे कॉलनीमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काही माणसांनी त्या आजीला कचऱ्यामधून बाहेर काढत कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.