Pune Raigad Road Update : पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा ऐतिहासिक वरंध घाट रस्ता 25 मार्च ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Pune Raigad Road Update : पुणे आणि रायगड जिल्ह्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऐतिहासिक आणि निसर्गरम्य असा वरंध घाट रस्ता सुमारे दीड महिन्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वरंध घाट का बंद करण्यात आला?

राष्ट्रीय महामार्ग 965 डी.डी. वरील हिर्डोशी ते वरंधा या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हा घाट दरडप्रवण असून रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक वळणांनी भरलेला आहे. एका बाजूला नीरा देवघर धरणाचे पाणी तर दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने कामाच्या काळात वाहतूक वळवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी हा मार्ग पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन

आगामी पावसाळ्याचा विचार करून घाटातील कठीण कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने वेगाने काम सुरू केले आहे. कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 25 मार्च 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत रस्ता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने काही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी माणगाव – निजामपूर – ताम्हिणी घाट – मुळशी – पिरंगुट – पुणे हा मार्ग उपलब्ध आहे. तर कोल्हापूर किंवा सातारा बाजूकडे जाण्यासाठी पोलादपूर – महाबळेश्वर – वाई – सातारा किंवा पोलादपूर – खेड – चिपळूण – पाटण हा मार्ग वापरता येणार आहे.

स्थानिकांसाठी विशेष व्यवस्था

घाट परिसरातील धामणदेव, हिर्डोशी, शिळीम या गावांतील नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन मर्यादित स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.