Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील स्थितीचा अंदाज मांडण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील पावसाची स्थिती कशी असणार हे देखील सांगण्यात आले आहे.
Maharashtra Rain Update : राज्यात उशिराने आलेल्या पावसाने आता सर्वांना दिलासा दिला आहे. संपूर्ण राज्यात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली. अशातच हवामान खात्याकडून पावसासंदर्भात नवा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट
आज (25 जून) हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि लातूर या ठिकाणी देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
यलो अलर्ट
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. येथे ताशी ५०-६० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच तर धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्येही यलो अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील स्थिती काय?
मुंबईत सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. तर मुंबईला पुढील 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूटापर्यंत पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.


