मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी ४ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केल्यात. यात श्रीधर दुबे यांची अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी, तर सत्यजित बडे यांची अपंग कल्याण आयुक्तपदी नियुक्ती केली.
मुंबई : राज्य प्रशासनात पुन्हा एकदा बदल्यांचे वारे वाहत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी ४ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. गेल्या काही काळापासून सुरू असलेला बदल्यांचा धडाका या आठवड्यातही कायम असून, महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी नव्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
कोणाची कुठे झाली नियुक्ती? (महत्त्वाची यादी)
१. श्रीधर दुबे (IAS २०१४): यांची 'महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ' (मुंबई) च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन (FDA), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. सत्यजित बडे: रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सत्यजित बडे यांची आता आयुक्त, अपंग कल्याण विभाग, पुणे या महत्त्वाच्या पदावर बदली झाली आहे.
३. डॉ. सुनील भोकरे: महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. भोकरे यांची आता आयुक्त, शहरी आरोग्य (मुंबई) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
४. राहुल कुलकर्णी: गृह विभागातील सहसचिव राहुल कुलकर्णी यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ (मुंबई) म्हणून नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.
बदल्यांचे सत्र सुरूच!
मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणेत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वीच वरिष्ठ अधिकारी मनिषा म्हैसकर-पाटणकर यांची नियुक्ती रिक्त झालेल्या अप्पर मुख्य सचिव (गृह) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली होती, तर मिलिंद म्हैसकर यांच्याकडेही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली होती.
प्रशासनात पारदर्शकता आणि कामात वेग आणण्यासाठी मुख्यमंत्री दर १०-१५ दिवसांनी बदल्यांचे हे निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे.


