भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील आमदार असल्याने त्यांच्याकडे सकाळपासून लोक येत असतात आणि काही वेळा अंघोळीपूर्वीच त्यांना भेटी द्याव्या लागतात. 

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ ट्विट करत ते अघोरी पूजा करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांवर आता भरत गोगावले यांनी अखेर मौन सोडले आहे. शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यासाठी दाखल झाल्यावर त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

गोगावले म्हणाले, "ग्रामीण भागातील आमदार आहोत, लोकं भेटायला येतात"

पत्रकारांनी सूरज चव्हाण यांच्या ट्विट केलेल्या व्हिडिओबाबत विचारले असता, गोगावले यांनी थेट उत्तर दिले. "आपण व्हिडिओत पाहिलं असेल, मी घरी बसलेलो आहे. ज्याला कुणाला काय अघोरी विद्या करायची असेल, तो असा व्हिडिओ काढू देऊ शकतो का?" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, "आम्ही ग्रामीण भागातील आमदार असल्यामुळे आमच्याकडे सकाळपासून लोकं येत असतात. अंघोळ करायच्या आधी टॉवेलवर आम्ही बसलेलो असतो. काही लोकांना आम्ही अंघोळ करण्यापूर्वी भेट देतो. कधीकधी फिरणारे महाराज, संत मंडळी येत असतात, त्यांना भेटी देऊन आमचं मार्गक्रमण सुरू असतं."

"आमच्याकडेही त्यांचे व्हिडिओ आहेत!",गोगावलेंचा इशारा

गोगावले यांनी यावेळी विरोधकांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. "अघोरी विद्या करणारा असा कधी कुणाचा व्हिडिओ काढून पोस्ट करायला लावेल का? ठीक आहे. ज्याला कर नाही त्याला डर नाही. त्यामुळे आम्ही फ्री वातावरणात फिरणारी लोकं आहोत. त्यामुळे त्याची आम्हाला काही अडचण नाही," असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "त्यांच्याकडे आमचे आणखी काही व्हिडिओ असतील तर ते त्यांनी शोधावेत, असं आम्हाला वाटतं. आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत. हे चुकीचं आहे. त्यांनाही विचारा ना हे सगळं तुम्ही कशासाठी करत आहात? त्यांचेदेखील व्हिडिओ आम्हाला भेटले आहेत. ते सुद्धा सुरू होतील," असा स्पष्ट इशारा गोगावले यांनी दिला.