Ajit Pawar Plane Crash : २८ जानेवारी रोजी झालेल्या अजित पवार विमान दुर्घटनेबाबत २२ पानी प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अहवालात कमी दृश्यमानता, रनवेवरील त्रुटी आणि शेवटच्या क्षणी कॉकपिटमधील धक्कादायक आवाजाचा उल्लेख आहे.
Ajit Pawar Plane Crash : २८ जानेवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताने राज्यभरात खळबळ उडाली होती. या दुर्घटनेनंतर एक महिन्याने AAIB कडून २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात अपघाताची कारणमीमांसा, हवामान स्थिती आणि विमानतळावरील त्रुटींचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
प्राथमिक अहवालात काय नमूद?
अहवालानुसार, लँडिंगच्या वेळी बारामती विमानतळावर दृश्यमानता केवळ ३ किलोमीटर होती, तर VFR नियमांनुसार किमान ५ किलोमीटर दृश्यमानता आवश्यक असते. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके होते.बारामती हे अनियंत्रित एअरफिल्ड असून रनवे मार्किंग फिकट, सैल खडी, रनवेच्या बाजूस विंडसॉक नसणे आणि संरक्षक भिंत अपुरी असणे अशा त्रुटी आढळल्या.
पहिल्या प्रयत्नात पायलटने ‘गो-अराउंड’ घेतले. दुसऱ्या प्रयत्नात “Field in sight” असे कळवण्यात आले. मात्र अंतिम क्षणी कॉकपिटमधून “Oh S**t…” असा आवाज नोंदवला गेला. विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे ५० मीटर अंतरावर कोसळले.
फ्लाइट रेकॉर्डर्सची स्थिती
दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्स म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर (SSFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (SSCVR) अवशेषांमध्ये त्यांच्या मूळ जागी आढळले. उच्च तापमानामुळे त्यांना नुकसान झाले होते. फ्लाइट डेटा रेकॉर्डरचा डेटा यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आला आहे. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा अमेरिकन मानांकनानुसार निर्मिती करणाऱ्या कंपनीमार्फत पुनर्प्राप्त केला जाणार आहे. तपासात असेही नमूद करण्यात आले की, उड्डाणापूर्वी दोन्ही पायलट्सची मद्यपान चाचणी निगेटिव्ह आली होती.
जय पवार यांचा गंभीर आरोप
दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत VSR चे मालक रोहित सिंह उड्डाणादरम्यान मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले असल्याचा दावा केला आहे. जय पवार यांनी म्हटले की, “माझ्या वडिलांना आपण गमावले. हा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे. DGCA ने तात्काळ कठोर कारवाई करावी. संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत VSR ची सर्व विमाने ग्राउंड करावीत आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.” त्यांच्या या मागणीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
पुढील तपास सुरू
अपघाताच्या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या दुर्घटनेने विमान सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.


