महाराष्ट्रात हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात पेटलेला वाद सरकारने त्रिभाषा धोरणाचा अध्यादेश रद्द केल्याने थांबला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चा रद्द झाला.
महाराष्ट्रात हिंदी सक्तीकरण केल्याच्या दिवसापासून निर्णयाच्या विरोधातील वाद पेटलेला आहे. त्रिभाषा धोरणाच्या सूत्राचा अध्यादेश रद्द केल्याची घोषणा सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हि घोषणा केल्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त उपस्थितीत होणारा मोर्चा रद्द करण्यात आला. हिंदी भाषेच्या विरोधात सर्वांनीच एकी दाखवली आणि हा अध्यादेश रद्द करण्यात आला.
हिंदीसक्ती केली, असा प्रचार चुकीचा
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, , "आम्ही हिंदीसक्ती केली असा चुकीचा प्रचार सुरू आहे. वास्तविक हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच घेतला होता. मात्र, सरकारमधून बाहेर गेल्यावर माणसे आधीचे निर्णय विसरतात. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना याबद्दल विचारले पाहिजे."
मराठी अभिनेता हेमंत ढोमेचे ट्विट व्हायरल
मराठी अभिनेता हेमंत ढोमे याचे ट्विट व्हायरल झाले आहे. तो दरवेळी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम करत असतो. त्यानं पोस्टमध्ये म्हटलं की, “मराठी शाळेतल्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आणि मुळात मराठी भाषेच्या वाढीसाठी, गोडीसाठी डॉ. दिपक पवार यांनी आजच्या कार्यक्रमात अत्यंत मुद्देसूद आणि कठोर शब्दांत आपल्या मागण्या ठेवल्या आहेत! मराठी भाषा केंद्र आणि सर्व समविचारी संस्थाच्या या मागण्या महाराष्ट्राच्या मराठी सरकारला मान्य कराव्याच लागतील!”
ढोमे पुढं बोलताना म्हणतो की, "या कार्यक्रमाला उपस्थित राहून पाठिंबा तर दिलाच, पण या लढ्यात या सर्वांसोबत शेवटपर्यंत सोबत राहून मला शक्य आहे ते योगदान देत राहीन हा निश्चय देखील केला! मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे… दूरदृष्टी असणाऱ्या सर्व मराठी प्रेमींना याची पूर्ण कल्पना आहे…"
