- Home
- Maharashtra
- Thane School Update: ठाण्यात पावसाचा कहर; 18 आणि 19 ऑगस्टला शाळांना सुट्टी, पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
Thane School Update: ठाण्यात पावसाचा कहर; 18 आणि 19 ऑगस्टला शाळांना सुट्टी, पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
Thane School Update: मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

ठाणे : मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी यासंदर्भात एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं असून, ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना 18 आणि 19 ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सुट्टी कोणत्या शाळांना लागू?
सुट्टीचा निर्णय सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी लागू असेल. यात खासगी, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सूचना
आज (18 ऑगस्ट) दुपारी सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी सोडण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांची राहील, असंही शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थी घरी पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय शाळा मुख्यालय सोडू नये, अशा स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
परीक्षा असल्यास नव्याने वेळापत्रक जाहीर होणार
या दोन दिवसांमध्ये जर कोणत्याही शाळांमध्ये परीक्षा नियोजित असतील, तर त्यांचे नव्या वेळापत्रकानुसार पुन्हा आयोजन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
हवामान खात्याचा रेड अलर्ट
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान केंद्र यांनी मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

