घोडबंदरवरील गायमुख घाटातील रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. अशातच या मार्गावरील वाहतूक 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टदरम्यान वळवण्यात आली आहे.
मुंबई : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्तेदुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात सुरू झाले होते. मात्र, कामात आणखी सुधारणा आवश्यक असल्याने शुक्रवार १५ ऑगस्टच्या पहाटेपासून ते १८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत या मार्गावरील जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अशातच प्रवाशांनी कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करावा हे पुढे जाणून घ्या.
खड्डेमुक्तीचे काम सुरू
ठाणे-घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. परिणामी, दररोज तासभराहून अधिक वेळ वाहनचालकांना वाहतूककोंडीत अडकून पडावे लागत आहे. या समस्येवर तोडगा म्हणून गेल्या आठवड्यात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
उपमुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या रस्त्याची पाहणी केली आणि तो पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले. आगामी गणपती उत्सव व इतर सण लक्षात घेऊन मिरा-भाईंदर महापालिकेकडून या रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग
- मुंबई व ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणारी अवजड वाहने – वाय जंक्शन व कापूरबावडी येथे प्रवेश बंद. या वाहनांना नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, माणकोली मार्गे अंजूर फाट्याकडे वळवण्यात येईल.
- कापूरबावडी जंक्शनकडून जाणारी वाहने – उजवे वळण घेऊन कशेळी, अंजूर फाट्यामार्गे वळवली जातील.
- मुंब्रा व कळव्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहने – खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद. ही वाहने खारेगाव खाडी पुलाखालून, खारेगाव टोलनाका, माणकोली मार्गे सोडली जातील.
- नाशिककडून येणारी वाहने – माणकोली नाक्यावर प्रवेश बंद. ही वाहने माणकोली पुलाखालून अंजूर फाट्याकडे वळवली जातील.
- गुजरातकडून येणारी वाहने – फाऊंटन हॉटेल आणि चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद. ही वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजूर फाटा, माणकोली, भिवंडी मार्गे सोडली जातील.


