- Home
- Maharashtra
- ST Bus Fare Hike : प्रवाशांना महागात बसणार एसटीचा प्रवास! लालपरीपासून शिवनेरीपर्यंत वाढले तिकीट दर
ST Bus Fare Hike : प्रवाशांना महागात बसणार एसटीचा प्रवास! लालपरीपासून शिवनेरीपर्यंत वाढले तिकीट दर
ST Bus Fare Hike : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) डिझेल दरवाढ आणि वाढत्या खर्चामुळे सर्व प्रकारच्या एसटी बस सेवांच्या तिकीट दरात सुमारे 14.95% वाढ केली आहे. ही भाडेवाढ 25 जानेवारीपासून लागू झाली.

प्रवाशांना महागात बसणार एसटीचा प्रवास!
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी एसटी बस सेवा आता प्रवाशांच्या खिशावर अधिक भार टाकणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) सर्व प्रकारच्या एसटी बस सेवांच्या तिकीट दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सुमारे 14.95 टक्क्यांची ही भाडेवाढ 25 जानेवारीपासून लागू करण्यात आली असून, याचा थेट परिणाम लाखो दैनंदिन प्रवाशांवर होणार आहे.
एसटीने प्रवास करण्याआधी ही माहिती नक्की वाचा
गेल्या तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. मात्र वाढते खर्च आणि आर्थिक दबाव लक्षात घेता भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. विशेषतः डिझेलच्या किमतीत सातत्याने झालेल्या वाढीमुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा ताण आला होता. यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता, वेतन सुधारणा, बसची देखभाल, टायर, सुटे भाग आणि तांत्रिक साहित्य यांच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे महामंडळाचा एकूण खर्च वाढत गेला आणि अखेर भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.
कसे असतील नवे एसटी तिकीट दर?
नवीन दरांनुसार साध्या लालपरीपासून ते वातानुकूलित प्रीमियम बसपर्यंत सर्वच सेवा महागल्या आहेत.
साध्या एसटी बससाठी प्रति 6 किमी टप्प्याला सुमारे 10 रुपयांची वाढ
शिवशाही एसी बससाठी प्रति 6 किमी सुमारे 16 रुपयांची वाढ
पुणे–मुंबई मार्गावरील शिवनेरी बसचे भाडे वाढले
लांब पल्ल्याच्या शिवशाही स्लीपर बसच्या तिकीट दरातही वाढ
यामुळे दैनंदिन तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात लक्षणीय बदल होणार आहे.
‘या’ प्रवाशांना दिलासा, सवलती कायम
भाडेवाढ जरी लागू झाली असली तरी सामाजिक सवलतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ही प्रवाशांसाठी दिलासादायक बाब आहे.
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना 50% सवलत कायम
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
65 ते 75 वयोगटातील नागरिकांना मिळणारी सवलत पूर्वीप्रमाणेच सुरू
महामंडळाने स्पष्ट केले आहे की सामान्य आणि गरजू प्रवाशांवरील भार कमी ठेवण्यासाठी या सवलती कायम ठेवल्या आहेत.

