- Home
- Maharashtra
- SSC, HSC Exam 2026: दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर! पहिला आणि शेवटचा पेपर कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती
SSC, HSC Exam 2026: दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर! पहिला आणि शेवटचा पेपर कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती
SSC, HSC Exam 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
मुंबई : राज्यातील दहावी (SSC) आणि बारावी (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 च्या बोर्ड परीक्षांचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे. या घोषणेमुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या अंतिम तयारीला वेग येणार आहे. आता परीक्षा सुरू होण्यास जवळपास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात येईल. तर, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या दरम्यान पार पडतील. एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील याच कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होईल. त्याआधी 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेतल्या जातील. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील याच काळात पार पडतील.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांत परीक्षा
या परीक्षा राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांद्वारे घेण्यात येणार आहेत. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण. शिक्षण मंडळाने सर्व विभागीय कार्यालयांना पूर्वतयारीचे आदेश दिले असून शाळांनाही परीक्षा आयोजनासंबंधी सूचना पाठवण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे
आता बोर्ड परीक्षा फक्त काही महिन्यांवर आली आहे.
मंडळाने वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
लवकरच अधिकृत विषयनिहाय टाइमटेबल मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

