- Home
- Maharashtra
- SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
SSC–HSC Exam 2026 : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी APAAR ID नोंदणी अनिवार्य केली. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका डिजिलॉकरवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणारय.

दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा अपडेट
SSC–HSC Exam 2026 : फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना ‘APAAR ID’ (अपार आयडी) नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID आवश्यक
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात गुणपत्रिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची मार्कशीट डिजिलॉकर (DigiLocker) या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे कायमस्वरूपी, सुरक्षित आणि अधिकृत डिजिटल मार्कशीट राहणार आहे.
प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक कामकाज होणार सोपे
डिजिटल गुणपत्रिकांमुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विविध महाविद्यालये, विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान भौतिक कागदपत्रांची गरज कमी होणार असून शैक्षणिक रेकॉर्ड सहज उपलब्ध होतील.
APAAR ID मुळे विद्यार्थ्यांना होणारे महत्त्वाचे फायदे
‘अपार आयडी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल रेकॉर्ड एकाच ठिकाणी सुरक्षित राहणार आहे.
याचे फायदे पुढीलप्रमाणे
सर्व शैक्षणिक गुणपत्रिका आयुष्यभर डिजिटल स्वरूपात उपलब्ध
पात्रतेची पडताळणी जलद आणि सुलभ
शासकीय शिष्यवृत्ती व योजनांचा लाभ घेणे सोपे
कुठूनही, कधीही शैक्षणिक रेकॉर्ड्स पाहण्याची सुविधा
दस्तऐवज हरवण्याचा किंवा नुकसान होण्याचा धोका नाही
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठीही सूचना
राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळा आणि ज्युनियर कॉलेजेसना त्यांच्या विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त APAAR ID नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) सादर करणे बंधनकारक आहे. तसेच, केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल राज्य मंडळाच्या कार्यालयात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उपक्रमामागील उद्देश
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सहज उपलब्ध करण्यासाठी राबवण्यात येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा, प्रवेश आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

