Holi of Hindi GR by Shiv Sena Thackeray group : हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे गट) ने हिंदी जीआरची प्रतिकात्मक होळी केली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात मराठी अस्मितेच्या संघर्षाचे रणशिंग फुंकण्यात आले.
मुंबई : राज्यातील हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करत आज शिवसेना (ठाकरे गट) कडून हिंदी जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हिंदीच्या सक्तीचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली असून, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी संघर्षाचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे वातावरण तापले असून, 'पहिलीपासून हिंदी शिकवणे' या निर्णयाला विविध मराठी संघटना, राजकीय पक्ष आणि भाषा प्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, त्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.
आजच्या आंदोलनात आदित्य ठाकरे, तसेच शिवसेना (ठाकरे गट) मधील सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. मराठी अभ्यास केंद्र आणि इतर समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींनीही या आंदोलनात सहभाग घेतला. आझाद मैदानावर शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून आपला आक्रोश व्यक्त केला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
जीआरच्या होळीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही सरकारवर दबाव टाकण्याच्या पलीकडे गेलो आहोत. हा निर्णय आम्ही मान्यच करत नाही. जर सरकार एखादी गोष्ट लादत असेल, तर आम्ही तो विषय येथेच संपवतो. आम्ही त्या जीआरची होळी करून स्पष्ट संदेश दिला आहे. आमचा हिंदीला विरोध नाही, पण त्याची सक्ती आम्हाला मान्य नाही.”
आगामी ५ जुलैचा मोर्चा हे या आंदोलनाचं निर्णायक पाऊल ठरू शकतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या एकत्र येण्यामुळे मराठी अस्मितेचा आवाज अधिक बुलंद होणार, हे निश्चित आहे.


