शिर्डी साईबाबा संस्थानने व्हीआयपी दर्शनावर वेळेची मर्यादा घालून सर्वसामान्य भक्तांच्या सुविधेसाठी एक मोठं आणि सकारात्मक पाऊल उचललं आहे.

शिर्डी - शिर्डीतील साईबाबा मंदिरात आता व्हीआयपी दर्शनांसाठी मर्यादा घालण्यात आली आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडिलकर यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

साईबाबा मंदिरात होणाऱ्या अनिर्धारित व्हीआयपी भेटीमुळे सर्वसामान्य भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे, व्हीआयपींना दिवसातून केवळ तीन वेळा 'ब्रेक दर्शन' मिळणार आहे, असा निर्णय संस्थानतर्फे घेण्यात आला आहे.

अनिर्धारित व्हीआयपी दर्शनांमुळे निर्माण होत होता गोंधळ

सध्या मंदिरात सामान्य दर्शनासाठी भाविकांच्या रांगा मोठ्या असतात. परंतु, कधीही कुणाही व्हीआयपीचे आगमन झाल्यावर सामान्य दर्शन थांबवले जात होते. यामुळे सामान्य भाविकांमध्ये नाराजी आणि त्रास वाढत होता. मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवरही ताण निर्माण होत होता.

नव्या वेळापत्रकानुसार व्हीआयपी दर्शनासाठी ठरावीक वेळा:

नवीन धोरणानुसार, सरकारी शिफारसी किंवा खास पास असलेल्या व्यक्तींनाच 'ब्रेक दर्शन' दिले जाईल, ते देखील खालील तीन ठरावीक वेळांमध्येच:

  • सकाळी ९.०० ते १०.००
  • दुपारी २.३० ते ३.३०
  • रात्री ८.०० ते ८.३०

या कालावधीत, विशेष दर्शनासाठी एक वेगळी बाजू निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे मुख्य रांगेतील भाविकांचा ओघ खंडित होणार नाही.

काही प्रतिष्ठित व्यक्तींना विशेष सूट

या नियमांमधून काही उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठित व्यक्तींना वगळण्यात आलं आहे. यामध्ये खालीलांचा समावेश आहे:

  • विद्यमान व माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान
  • राज्यपाल, सरन्यायाधीश
  • केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार, आमदार
  • प्रख्यात उद्योजक, चित्रपट कलाकार, शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय खेळाडू
  • तसेच संस्थानाला १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम दान करणारे देणगीदार

खासदार सुजय विखे-पाटील यांची मागणी

माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी 'ब्रेक दर्शन प्रणाली' पुन्हा सुरु करावी, तसेच ती सुव्यवस्थित करावी, अशी मागणी संस्थानकडे केली होती. त्यावर गंभीरपणे विचार करून संस्थानने नव्या प्रणालीची अंमलबजावणी केली आहे.

सर्वसामान्य भक्तांच्या सुविधेसाठी मोठं पाऊल

साई संस्थानच्या या निर्णयाचे अनेक भाविक स्वागत करत आहेत. यामुळे अनावश्यक गोंधळ टळेल, भक्तांना शांततेत आणि सुव्यवस्थीत दर्शन मिळेल, अशी अपेक्षा आहे. दररोज लाखो भाविक शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. अशावेळी विना-अडथळा सुरू होणाऱ्या व्हीआयपी दर्शनांमुळे सामान्य भाविकांचं नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय निर्णायक ठरेल, असं बोललं जातं आहे.