शनि शिंगणापूर देवस्थानमधील विश्वस्त मंडळाने मोठा आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण समोर आले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनि शिंगणापूर देवस्थानमधील विश्वस्त मंडळाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या चौकशी अहवालातून उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत माहिती देताना सांगितले की, संबंधित विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून, जे विश्वस्त लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीचीही चौकशी केली जाणार आहे.

शिवसेनेचे आमदार विठ्ठल लंघे व इतरांनी लक्षवेधी सूचना मांडून या घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले. फडणवीसांनी स्पष्ट केले की, "देवस्थानातील सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. बनावट अ‍ॅप, नकली पावत्या, बनावट कर्मचारी अशा मार्गाने कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे." इतकेच नव्हे तर, "देणग्यांवरही अडथळा आणत देवालाही लुटण्याचा प्रकार या विश्वस्तांनी केला आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

या गंभीर घोटाळ्याची दखल घेत सायबर विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली स्वतंत्र पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांवर आणि विश्वस्तांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले असून, या प्रकरणाचा तपासही बाह्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.

यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, "जे विश्वस्त शासकीय पदांवर कार्यरत आहेत, त्यांची वैयक्तिक संपत्ती तपासली जाईल. त्यांची जबाबदारी ठरवली जाईल." तसेच, "शनि शिंगणापूर मंदिराचे विश्वस्तमंडळ लवकरच बरखास्त करण्यात येणार असून, या मंदिराचे व्यवस्थापन शिर्डी व पंढरपूरप्रमाणे सरकारकडे हस्तांतरित करण्यात येईल," अशी घोषणाही त्यांनी केली.

शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. येथे शनी देवतेचे जागृत आणि स्वयंभू रूपातील मंदिर आहे, जे दार नसलेल्या घरांसाठी आणि चोरी न होणाऱ्या गावासाठी प्रसिद्ध आहे.

मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरात शनी देवाची मूर्ती गाभाऱ्यात न ठेवता उघड्यावर स्थापित आहे, आणि भक्त थेट दर्शन करू शकतात. शनी शिंगणापूर गावातील अनेक घरांना दारं किंवा कुलुप नसतात, कारण गावकऱ्यांचा विश्वास आहे की शनी देव स्वतः गावाचे रक्षण करतात, आणि येथे चोरी करणे म्हणजे शनीचा कोप ओढवून घेणे.शनिवारी येथे विशेष पूजाविधी आणि दर्शनासाठी हजारो भाविक येतात. शनी अमावस्येला किंवा शनिशनिवाराला येथे मोठी गर्दी होते. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचा अद्वितीय नमुना असून, शनी उपासकांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते.