Shalinitai Patil Passes Away : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे वयाच्या ९४व्या वर्षी मुंबईत निधन झाले. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असलेल्या शालिनीताई आपल्या करारी, लढाऊ आणि स्पष्टवक्त्या नेतृत्वासाठी ओळखल्या जात होत्या.

मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज, 20 डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील माहीम येथील राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या.

कोरेगाव येथे होणार अंत्यसंस्कार

शालिनीताई पाटील यांच्यावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निर्भीड आणि ठाम आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

लढाऊ आणि ठाम भूमिका असलेलं नेतृत्व

शालिनीताई पाटील यांची ओळख करारी, लढाऊ आणि स्पष्टवक्त्या नेत्या अशी होती. त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं. १९८३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर, त्या सांगली मतदारसंघातून अल्पकाळासाठी लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.

महसूल मंत्रीपद आणि सामाजिक मुद्द्यांवर ठाम भूमिका

ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिले. १९८० साली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली, तसेच आरक्षण देताना आर्थिक निकषांचाही विचार व्हावा, यासाठी त्या आग्रही होत्या. सामाजिक न्याय, समता आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी त्या सातत्याने आवाज उठवत राहिल्या.

निर्भीड मत मांडणारी नेत्या

आपली मते कोणत्याही दबावाशिवाय निर्भीडपणे आणि स्पष्ट शब्दांत मांडणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताई पाटील यांना राजकीय वर्तुळात विशेष मान होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.