सेबीकडून कर्जत येथील ट्रेडिंग गुरू म्हणून ओखळल्या जाणाऱ्या अवधूत साठेंच्या अॅकेडमीविरोधात कारवाई केली आहे. खरंतर, पेनी स्टॉक्सला प्रोत्साहन देणाऱ्या ऑपरेटर्ससोबत मिळून किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई : शेअर मार्केट शिकण्यासाठी क्लास लावणं परवडत नाही म्हणून अनेक लोक सोशल मीडियावर फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करतात. पण कोणतीही माहिती न काढता किंवा नीट अभ्यास न करता फक्त क्लास जॉइन करणं धोकादायक ठरू शकतं. अशावेळी फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. याच पार्श्वभूमीवर SEBI ने गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर पाऊल उचललं आहे. याबद्दलचा रिपोर्ट मनी कंट्रोल यांनी दिला आहे.
अवधूत साठे यांच्यावर कारवाईचा इशारा
SEBI ने मुंबईतील प्रसिद्ध फायनान्शियल इन्फ्लुएन्सर अवधूत साठे यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांचे YouTube चॅनल तब्बल 9,36,000 हून अधिक सबस्क्राइबर्सपर्यंत पोहोचलं आहे. या चॅनलवर ते मार्केट अॅनालिसिस, चार्ट पॅटर्न्स आणि गुंतवणुकीच्या रणनीतींबद्दल माहिती देतात. गुरुवारी FICCI च्या एका कार्यक्रमात सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. त्यांनी नाव थेट घेतलं नसले तरी त्यांच्या वक्तव्यामुळे ही बाब चर्चेत आली.
कोण आहेत अवधूत साठे?
अवधूत साठे हे एक नामांकित मार्केट इन्फ्लुएन्सर आणि ट्रेडिंग गुरू म्हणून ओळखले जातात. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि कर्जत येथील त्यांच्या ट्रेडिंग अकादमीच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या क्लासेसद्वारे अनेकांनी ट्रेडिंग शिकल्याचा दावा केला जातो.
सेबीच्या कारवाईचे कारण
साठे यांच्या काही क्लासेस आणि कार्यक्रमांबाबत सेबीला तक्रारी मिळाल्या होत्या. पेनी स्टॉक्सला प्रोत्साहन देणाऱ्या ऑपरेटर्ससोबत मिळून किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात असल्याचा संशय होता. त्यामुळेच सेबीने कर्जत येथील त्यांच्या अकादमीत चौकशीचे आदेश दिले. या चौकशीमुळे त्यांच्या कामकाजावर सेबीची बारीक नजर असल्याचं समोर आलं.
सेबीचा इशारा
कमलेश वार्ष्णेय यांनी स्पष्ट केलं की, चुकीच्या मार्गाने काम करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की, खरे शिक्षण देणारे आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे यात फरक ओळखणं महत्त्वाचं आहे. जर कोणी हमीयुक्त परताव्याचे दावे करत असेल, थेट गुंतवणुकीचे सल्ले देत असेल किंवा क्लासरूममध्ये लाइव्ह मार्केट डेटा वापरत असेल, तर अशांसाठी सेबीचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. मात्र केवळ माहिती देणाऱ्यांना ‘इन्व्हेस्टर एज्युकेशन’ अंतर्गत प्रोत्साहन देता येईल.


