sanjay raut: शिवसेना (ठाकरे गट) च्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे AI द्वारे सादर केलेले भाषण भाजप आणि शिंदे गटावर टीकात्मक होते. यावरून संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आणि शिवसेनेला धमक्या देऊ नका असा इशारा दिला.
sanjay raut: शिवसेना (ठाकरे गट) आयोजित निर्धार मेळाव्यात इतिहास जणू पुन्हा जिवंत झाला! बाळासाहेब ठाकरे यांचं AI द्वारे सादर केलेलं भाषण प्रेक्षकांना भावविवश करून गेलं, पण याच भाषणातून भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका झाल्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपला शिवसेनेने दिलेला खांदा, त्यानंतर झालेली फसवणूक आणि पक्षफूट या सगळ्याचा हिशोब AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवण्यात आला. यामुळे शिंदे गटाने जोरदार प्रतिउत्तर दिलं, पण त्यावर खासदार संजय राऊत यांनी थेट अमित शाह, शंभूराज देसाई आणि गिरीश महाजन यांच्यावर शब्दांचा भडिमार केला.
राऊतांचा शंभूराजेंवर निशाणा, "पोकळ वक्तव्य करणाऱ्यांनी इतिहास आधी समजून घ्यावा"
संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांना उद्देशून म्हटलं की, "काँग्रेसमधून उडी मारलेले लोक आम्हाला इतिहास शिकवणार?" त्यांनी असंही नमूद केलं की शंभूराज देसाईंचा भाजपमध्ये काहीच टिकाव नाही, ते फडणवीसांच्या चाकरीत अडकले आहेत.
"अमित शाह म्हणजे एसंशि शिवसेनेचे प्रमुख!"
AI भाषणातून सुरु झालेल्या वादाचं पर्यवसान संजय राऊतांच्या आक्रमक टीकेत झालं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "भाजपने बनावट संघटना तयार करून शिवसेनेचं नाव हडप केलं. हे बाळासाहेबांचं नाही, तर अमित शाह यांचं शिवसेनेवर कब्जा करण्याचं राजकारण आहे."
"धर्मवीर, चित्रपट आणि बनावट कथा, आमचा विरोध बनावटगिरीला!"
संजय राऊत यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाचा उल्लेख करत शिंदे गटावर टोला लगावला. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, “आनंद दिघे यांचं नाटक करून तुम्ही त्यांचे विचार हायजॅक करता? आम्ही त्यांना प्रत्यक्षात ओळखत होतो. तुमचा त्या काळाशी काय संबंध?”
"गिरीश महाजन, कानातले बोळे काढा!"
राऊतांनी गिरीश महाजन यांना उद्देशून ही उपरोधिक टीका केली की, "उद्धव ठाकरे सुट्टीची मागणी करतात, कारण रायगडावर शिवरायांविषयी खोटं बोललं जातं. हा छत्रपतींचा अपमान आहे. आणि तुमचं त्यावर ऐकू येत नसेल, तर ती तुमचीच अडचण!"
शेवटी एक इशारा, "शिवसेनेला धमक्या नकोत!"
"फोटो काढा, पण शिवसेना संपणार नाही", असं राऊत ठामपणे म्हणाले. त्यांनी भाजपवर आणि शिंदे गटावर आरोप केला की, "लुटलेला पैसा वापरून कार्यकर्ते विकत घेताय, पण निष्ठा विकत मिळत नाही!"
