कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडल्याचे आपण पाहिले. यावरुनच आता विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच उबाठाचे खासदार संजय राऊतांनीही कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्व स्तरात बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्यासह जीवितहानी झाल्याची माहिती काल (06 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याशिवाय मुंबई-पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा असे आवाहन केले होते. यावरुनच आता उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी कनेक्टिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न उपस्थितीत केले.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी कनेक्टिंग लिंकजवळ मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याच्या घटनेवर भाष्य केले. राऊतांनी म्हटले की, साडेचार हजार कोटी पावसात वाहून गेले. याशिवाय प्रकल्पाच्या इन्फ्रास्टक्चरवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. तसेच भाजपाच्या सध्याच्या राजकरणावरुनही संजय राऊतांनी टीका केली.
संदीप देशपांडेंचीही टीका
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी सोशल मीडियावर टीका केली. संदीप देशपांडे यांनी म्हटले की, दरड कोसळण्याच्या प्रकारासाठी नेहरूच जबाबदार आहेत. पण तरीही ज्यांना राज्य सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानात जावे. अशी खोचक टीका राज्य सरकारवर केली.
कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे ट्विट केले आहे. प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी सुरक्षित रहावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


