Sambhaji Bhide Controversy : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना 'राष्ट्रद्रोही' संबोधून आणि महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केला आहे.
पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करताना संभाजी भिडे यांनी “शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही” असा आरोप केला आहे. यासोबतच त्यांनी “लवासाची कीड काढून टाकली पाहिजे” अशी टीकाही केली. इतकंच नाही, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केल्याची माहिती समोर आली असून, या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया
संभाजी भिडे हे याआधीही अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. मात्र यावेळी त्यांनी दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय पक्षांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या विधानांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “मी थोड्यावेळापूर्वीच संभाजी भिडे यांचं वक्तव्य ऐकलं. ते महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जाणारं आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर देश आणि राज्याच्या उभारणीत मोठं योगदान दिलं आहे,” असं पासलकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “कृषी, उद्योग, संरक्षण क्षेत्रात महिलांना संधी देण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणं अत्यंत निंदनीय आहे.”
सरकारकडे कारवाईची मागणी
“अशा प्रकारच्या वक्तव्याची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी,” अशी मागणी करत विकास पासलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश तपासे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “संभाजी भिडे यांची वादग्रस्त वक्तव्ये ही काही नवीन गोष्ट नाही. इतिहासाचे चुकीचे संदर्भ देणे, समाजात तेढ निर्माण करणे आणि महाराष्ट्र घडवणाऱ्या नेत्यांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे, हेच त्यांचं काम झालं आहे,” असा घणाघात तपासे यांनी केला. “ज्यांनी मागासवर्गीय समाज, शेतकरी आणि महाराष्ट्र उभा केला, देशासाठी योगदान दिलं अशा शरद पवारांबाबत केलेलं हे वक्तव्य चुकीचं आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे,” असंही ते म्हणाले.


