Sachin Tendulkar Laalbaugcha Raja Darshan : सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याने अर्जुनच्या साखरपुड्याची बातमीही दिली. अर्जुनचा साखरपुडा सानिया चांडोकसोबत झाला आहे.
मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर नुकताच कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुनही सोबत होते. बाप्पाच्या दर्शनासाठी येताच 'सचिन-सचिन' च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. लालबागच्या मंडपात वानखेडे स्टेडियमसारखा माहोल तयार झाल्याचं पाहून सचिनही भारावून गेला. ही बाप्पाचीच कृपा असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
यावेळी दर्शनानंतर समोरच्या स्क्रीनवर सचिनचा २५ वर्षांपूर्वीचा फोटो दाखवण्यात आला, ज्यात तो लालबागच्या राजाचं दर्शन घेताना दिसत होता. हा जुना क्षण पाहून तो भावूक झाला.

अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा
गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याची चर्चा सुरू होती. आता खुद्द सचिननेच या बातमीला दुजोरा दिला आहे. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने, 'हो, अर्जुनचा साखरपुडा झाला आहे. आम्ही सर्वजण त्याच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहोत,' असं सांगितलं. अर्जुनचा साखरपुडा सानिया चांडोकसोबत झाला आहे. हा सोहळा अत्यंत खाजगी होता आणि कुटुंबातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तो पार पडला.
कोण आहे सानिया चांडोक?
सानिया चांडोक ही मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील आहे. ती प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे, ज्यांचा हॉस्पिटॅलिटी आणि फुड उद्योगात मोठा हात आहे. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीसारखे प्रसिद्ध ब्रँड्स त्यांच्या मालकीचे आहेत.


