लालबागच्या राजाच्या पहिल्याच दिवशीच्या दानपेटीत कोट्यवधी रुपये, अमेरिकन डॉलर्सचा हार आणि क्रिकेट बॅट आढळून आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, सचिन तेंडुलकर आणि ठाकरे कुटुंबियांसह अनेक मान्यवरांनी बाप्पाचे दर्शन घेतले.
मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं उत्साही वातावरण शिगेला पोहोचलं आहे. विशेषतः मुंबईतील ‘लालबागचा राजा’ यंदाही भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरला आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आणि त्यांच्या भक्तीचं दर्शनही ‘दानपेटीतून’ घडलं!
दानपेटी उघडली आणि भाविक थक्क!
लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवशीची दानपेटी उघडण्यात आली असून, त्यातील देणग्या पाहून मंडळाचे सदस्यही अचंबित झाले. यामध्ये अमेरिकन डॉलर्सचा हार, कोट्यवधींच्या रकमा, क्रिकेट बॅट अशा अनोख्या भेटवस्तूंचा समावेश होता. ही केवळ भक्ती नाही, तर आस्थेचं आणि श्रद्धेचं अनोखं रूप आहे.
कोट्यवधींचा हिशोब सुरू
मंडळाचे कोषाध्यक्ष मंगेश दत्ताराम दळवी यांनी सांगितलं की, “ही फक्त पहिल्या दिवसाची पेटी आहे. एकूण तीन पेट्या आहेत. सध्या एका पेटीची मोजणी सुरू असून, सुमारे 80 लोक मोजणीसाठी तैनात आहेत. गेल्या वर्षी पहिल्या दिवशीच 48 लाख रुपयांची देणगी आली होती.”
सेलिब्रिटींची दर्शनासाठी उपस्थिती
गणेश दर्शनासाठी अनेक दिग्गज मंडळीही लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाली. सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, तसेच क्रिकेटचे भगवान सचिन तेंडुलकर हे संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. याशिवाय उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं.
सुरक्षा व्यवस्थेला कडेकोट कवच
गणेशोत्सव शांततेत पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शहरात 17,600 पेक्षा अधिक पोलीस जवान, ड्रोन यंत्रणा, श्वान पथकं, बॉम्ब निकामी पथकं हे सर्व सुरक्षा यंत्रणेचा भाग आहेत.
समाजभान आणि शिस्तीचं आवाहन
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व गणेश मंडळांना आवाहन केलं आहे की, कार्यक्रम राजकारणविरहित, संस्कृतीप्रधान आणि भक्तिभावाने परिपूर्ण असावेत.
मुंबईत भक्तीचा महासागर
लालबागचा राजा याशिवाय, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्ली, तेजुकाया, आदी मंडळांमध्येही भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण मुंबईत सध्या गणेशभक्तीची लाट उसळली आहे.


