Rupali Chakankar Resignation : अशोक खरात प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वाढत्या दबावामुळे रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडत निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.
Rupali Chakankar Resignation : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.
राजीनाम्यापूर्वीची घडामोडी
अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
चाकणकर यांची भूमिका काय?
राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी स्पष्ट केले की, त्या संबंधित ट्रस्टच्या केवळ सदस्य होत्या. शिवनिका संस्थानमध्ये काम करत असताना त्या ट्रस्टशी जोडल्या गेल्या होत्या. ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपला असल्याचे त्यांनी सांगितले.
“श्रद्धा होती, पण खरातची दुसरी बाजू माहिती नव्हती”
चाकणकर म्हणाल्या की, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने अशोक खरात यांना आध्यात्मिक गुरू म्हणून मानले होते. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा कथित कृत्यांबाबत कोणतीही माहिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
निष्पक्ष तपासाची मागणी
या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी केली असल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र दिले असून मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वालाही भेटून तपास पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी केली आहे.
आरोपांबाबत खंत व्यक्त
“अशोक खरातने केलेले कृत्य अत्यंत चुकीचे आणि घाणेरडे आहे. त्याचे आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करणार नाही. पोलिसांनी कठोर कारवाई करावी,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “अनेक लोकांचे फोटो त्याच्यासोबत आहेत, मात्र एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले याचे वाईट वाटते,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


