Monsoon Update : राज्यात पावसाच्या सरी कधी कोसळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जून महिना अर्धा संपला तरीही पावसाचा पत्ता नाही. अशातच पुढील ४-५ दिवसांसाठी हवामानात कोणते बदल होणार आहेत याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Monsoon Update : राज्यात मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येकासाठी भारतीय हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनचा वेग मंदावला गेला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावरील अनुकूल हवामान परिस्थितीचा अभाव निर्माण झाल्याने राज्यात पावसाला उशिर होत आहे. ८ जून रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला होता. मात्र त्यानंतर पुढील प्रवास मंदावला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अरबी समुद्रातील स्थिती

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेले अरबी समुद्रातून येणारे ओलसर वारे सध्या मंदावले आहेत. त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीसह अंतर्गत भागात आर्द्रतेचा अभाव निर्माण झाला असून पावसासाठी आवश्यक असे हवामान तयार होत नाही. मान्सूनच्या सक्रियतेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाहही अलीकडच्या काळात मंदावला आहे.

कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीय वारे किंवा पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेच्या दाबाचा कमी दाबाच्या पट्ट्याची स्थिती निर्माण झाली नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) यासारख्या जागतिक हवामान खात्याकडून सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पुरेशी मदत मिळत नाहीये असेही सांगण्यात आले आहे.

पुढील चार ते पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता

या परिस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे उष्णता आणि दमट हवामानाचा नागरिकांना आणखी काही दिवस सामना करण्याची शक्यता आहे.

कोकणात पावसाचा जोर वाढणार?

दरम्यान, हवामान विभागानुसार येत्या २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकण किनारपट्टीवर पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढलेला दिसून येऊ शकतो. त्यानंतर राज्यातील उर्वरित भागांमध्येही मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास अनुकूल हवामान तयार होऊ शकते. यासाठी आवश्यक हवामान बदलांवर हवामान विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.