मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या नियमात सरकारने बदल केला आहे. १ मे पासून लागू होणारा हा नियम आता पुढे ढकलण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २०२६ पासून होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे चालक संघटनांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. १ मेपासून हा नियम लागू होणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. मात्र परिवहन विभागाच्या बैठकीनंतर तत्काळ अंमलबजावणी होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे चालक संघटनांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नवीन तारीख दिली जाणार
सरकारकडून आता या नियमासाठी नवीन तारीख जाहीर केली जाणार असल्याची चर्चा आहे. उपलब्ध माहितीनुसार, मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी आता १५ ऑगस्ट २०२६ पासून केली जाऊ शकते. अंतिम निर्णय लवकरच अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात काही चालक संघटनांनी संपाचा इशाराही दिला होता. परवाना नूतनीकरण, तपासणी आणि मराठी ज्ञानाची अट यावर चालकांमध्ये नाराजी दिसून आली होती. त्यामुळे सरकारने भूमिका मवाळ केल्याचे मानले जात आहे.
सरकार चालकांना देणार
प्रशिक्षण दरम्यान, राज्य सरकारने मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याचा आपला निर्धार कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रशिक्षण देण्याची तयारीही सरकारने दर्शवली आहे. आता १५ ऑगस्टची तारीख अधिकृतपणे जाहीर होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारचा पुढील निर्णय चालक, प्रवासी आणि राजकीय वर्तुळासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


