Ratnagiri : रत्नागिरीतील खेड तालुक्यातील ज्येष्ठ दुर्गप्रेमी भागोजी कोंडीराम भंडारे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड या किल्ल्यांच्या प्रत्येक वाटेची अचूक माहिती त्यांना होती.
Ratnagiri : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गडवाटा आणि गडावरील पुरातन अवशेषांची अचूक माहिती असणारे ज्येष्ठ दुर्गप्रेमी भागोजी कोंडीराम भंडारे (वय 85) यांचे नुकतेच निधन झाले. भागोजी बाबा म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून गडप्रेमी आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
महिपतगडच्या पायथ्याशीच आयुष्य व्यतीत केले
खेड तालुक्यातील वाडीबेलदार (महिपतगड पायथा) येथील ते रहिवासी होते. सह्याद्रीच्या रांगेतील महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड या गडरांगा गिरीभ्रमणासाठी अवघड मानल्या जातात. मात्र या गडरांगांतील प्रत्येक वाट, दरी, खिंड, जंगलातील प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती यांची खड्यानखडा माहिती भागोजी बाबांकडे होती. अनेक ट्रेकर्स आणि दुर्गप्रेमींसाठी ते मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान ठरले होते.
महिपतगडाच्या पुरातन अवशेषांचे होते जिवंत विश्वकोश
महिपतगड हा तब्बल १२० एकरांच्या परिसरात पसरलेला प्राचीन किल्ला आहे. या गडाची प्रत्येक रचना, अवशेष, त्याचे ऐतिहासिक महत्त्व याची सखोल माहिती भागोजीभाऊंना होती. हातलोट खिंड–मधुमकरंदगड–प्रतापगड या गडट्रेकच्या वाटांवर ते नेहमीच मार्गदर्शन करीत असत. त्यामुळे गडप्रेमींसाठी ते नेहमीच आदराचे स्थान होते.
आयुष्यातील संकटांवर मात करून जपला गडकिल्ल्यांचा वारसा
पन्नास वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतरही त्यांनी संसाराची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. वयोमानानुसार त्यांच्या हालचाली मर्यादित झाल्या असल्या तरी गडकिल्ल्यांबद्दलची त्यांची ओढ अखेरपर्यंत कायम राहिली. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.
“भागोजीभाऊंनी जपलेला वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली”
“गडकिल्ल्यांचे आणि परिसरातील निसर्गाचे ज्ञान असणाऱ्या ज्येष्ठ जाणकार व्यक्ती आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. भागोजीभाऊंनी आयुष्यभर जपलेला हा वारसा पुढे कार्यरत ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशी प्रतिक्रिया गड-किल्ला समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि दुर्ग अभ्यासक प्रवीण कदम यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.


