गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील सुमारे ३५ हजार महिलांनी अथर्वशीर्षाचे पठण केले. यावेळी भरभूर पाऊस येत होता तरीही महिलांचा उत्साह कमी झाला नाही. त्यामुळे या महिलांचे कौतुक करण्यात येत आहे.
पुणे - गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरात गणपती बाप्पाचे स्वागत झाले आहे. मुंबई आणि पुणे शहरात भक्तिमय वातावरण आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर आज सकाळी विशेष अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
ऋषीपंचमीच्या निमित्ताने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण केले. सकाळी थोडासा पाऊस पडत असतानाही महिलांचा उत्साह कमी झाला नाही. पहाटे तीन वाजल्यापासूनच महिलांनी मंडपात गर्दी करायला सुरुवात केली होती. या प्रसंगी खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. "अथर्वशीर्ष पठण केल्यावर वर्षभरासाठी नवी ऊर्जा मिळते," असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले.
"ॐ गं गणपतये नमः" या गजरात हजारो महिलांनी सामूहिक पठण करून गणरायाला वंदन केले. वातावरणात भक्ती, श्रद्धा आणि उर्जा पसरली होती. स्त्रीशक्तीचा जागर करणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावर्षी ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष साजरे होत असल्याने या सामूहिक पठणाला विशेष महत्त्व होते. कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने झाली, त्यानंतर ओंकार जप करण्यात आला. महिलांनी अथर्वशीर्ष पठण करताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. हा सामूहिक कार्यक्रम दरवर्षी एकदाच आयोजित केला जातो.


