पुण्यात पाणीच पाणी का झालं?, मुख्यमंत्री शिंदेंनी पूरस्थितीची दिली माहिती

| Published : Jul 25 2024, 03:30 PM IST / Updated: Jul 25 2024, 05:01 PM IST

eknath shinde
पुण्यात पाणीच पाणी का झालं?, मुख्यमंत्री शिंदेंनी पूरस्थितीची दिली माहिती
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Pune Rain : पुण्यात खडकवासला धरणात आणि पाणलोट क्षेत्रातही खूप पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास २५५ मिमी पाऊस पडला. मुळशीमध्ये ७० मिमी पाऊस पडला. त्याचा दुहेरी फटका बसला आहे. म्हणून पुण्यात सर्व परिसरात पाणी झालं आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Pune Rain : पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी २ ते ३ फूट इतकी आहे. खडकवासला धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात ही परिस्थिती उद्भवली असताना प्रशासन व सरकारच्या पातळीवर नेमकी काय हालचाल चालू आहे, यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

पुण्यात पाणी साचण्याचे नेमकं कारण काय?

“मुंबई, पुणे, रायगड या भागात मोठा पाऊस झाला आहे. उर्वरीत महाराष्ट्रातही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय. मी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यात खडकवासला धरणात आणि पाणलोट क्षेत्रातही खूप पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास २५५ मिमी पाऊस पडला. मुळशीमध्ये ७० मिमी पाऊस पडला. त्याचा दुहेरी फटका बसला आहे. म्हणून पुण्यात सर्व परिसरात पाणी झालं आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी आर्मीलाही सज्ज राहण्याच्या दिल्या सूचना

“मी पुणे पालिका आयुक्त, पिंपरी पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याबरोबरच एसडीआरएफ, एनडीआरएफ यांनाही सूचना दिल्या आहेत. स्थानिक यंत्रणा, अग्निशमन विभाग या सर्व यंत्रणा काम करत आहेत. मी आर्मीलाही अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मेजर जनरल अनुराग वीज यांच्याशीही मी बोललो आहे. कर्नल संदीप यांनाही मी फोन केला होता. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या रेस्क्यू टीमही तैनात ठेवण्यास मी सांगितलं आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

'शाळा आणि कार्यालयांना सुट्ट्या देण्याच्या सूचना'

“एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील आणि त्यांना एअरलिफ्ट करण्याची गरज भासली, तर तीही तयारी ठेवली आहे. आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, बचाव पथकं या सर्वांनी मिळून टीमवर्क दाखवून पुणेकरांना मदत करा आणि पूरस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्यासाठी पाणी, जेवण व राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा व कार्यालयांना सुट्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी प्रशासनाच्या संपर्कात आहे. मुंबईत कंट्रोल रूमध्ये अजित पवारांशी संपर्क झाला आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

'मुंबईकरांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे'

“आम्ही मुंबई महापालिका आयुक्तांशी बोललो. तिथे २५२ पंप सुरू आहेत. अंधेरीचा सबवे पाण्यामुळे बंद आहे. बाकी कुर्ला-घाटकोपरजवळ साचलेलं पाणी काढण्याचं काम सुरू आहे. रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा फिल्डवर काम करते आहे. मुंबईत ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुढचे ३-४ तास सावध राहण्याची गरज आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं किंवा सुरक्षित स्थळी राहावं अशी विनंती मी नागरिकांना करतो. नागरिकांचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा : 

Pune Rain News : 'पुण्यात महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका' : अजित पवार